"निवडणुकीत आशीर्वाद द्या, नाहीतर 1500 रुपये परत घेणार"; 'लाडकी बहीण' योजनेवरुन रवी राणांचं वक्तव्य

आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांची रक्कम 3 हजार रुपये करू. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार, असा दम रवी राणा यांनी उपस्थित महिलांना दिला.  

Advertisement
Read Time: 2 mins

आगामी विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना महायुतीच्या प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार अजित पवारांसह महायुतीच्या नेत्यांकडून सुरु आहे. मात्र आता याच योजनेच्या नावाने आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अमरावती येथील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात आमदार रवी राणा बोलत होते. 

आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांची रक्कम 3 हजार रुपये करू. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार, असा दम रवी राणा यांनी उपस्थित महिलांना दिला.  ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं रवी राणा म्हणाले. 

आधी दम, मग सारवासारव

या वक्तव्यानंतर झालेल्या टीकेवर रवी राणा यांनी सारवासारव देखील केली. बहीण-भावाच्या नात्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गमतीने बोललो. विरोधक माझ्या वक्तव्याचा बाऊ करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं. 

येणाऱ्या काळात सरकार आल्यावर 1500 रुपयांवरून 3 हजार रुपये महिना करण्याची मागाणी सुद्धा मी केली आहे. आशा वर्कर, मदतनीस यांचा पगार वाढावा ही सुद्धा मी मागणी केली आहे. विरोधकांनी काही चांगल्या गोष्टी शिकले पाहिजे. बहीण-भावाच्या नात्यामधली गोष्ट पकडून विरोधक आपली राजकीय पोळी शेकत आहे, असा आरोपही रवी राणा यांनी केला.

Advertisement