
पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज 19 वर्ष पूर्ण होत आहेत. मनसेचा हा 19 वा वर्धापनदिनानिमित्त पिंपरी चिंचडमध्ये मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. तसेच आगामी वाटचाल आणि रणनितीवरही भाष्य केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले राज ठाकरे?
"आपण 19 वर्षात काय केलं? देव करो त्याला दृष्ट न लागो, पण आज असंख्य पक्षांना एक प्रश्न पडलाय. ह्यांना फक्त मतं मिळतात, ना कोणी आमदार ना कोणी खासदार तरी ह्यांचे कार्यकर्ते एकत्र कसे राहतात. फेरीवाले कष्ट करत असतात, काम करतात. पण आज राजकीय फेरीवाले फिरतायेत, तसे आपल्या पक्षात नाहीत. या फुटपाथ वरून डोळा मारला की तो दुसऱ्या फुटपाथवर जातो. आपण असले फुटपाथ बांधणार नाही तर आपल्याला निष्ठवंतांसाठी पर्मनंट दुकान थाटायचं आहे," असा निर्धार राज ठाकरेंनी व्यक्त केला.
"पक्षसंघटना मजबूत करणे जास्त गरजेचे आहे. माझा जो गटाध्यक्ष आहे त्याच्या घरच्यांना पण वाटले पाहिजे की त्याची काळजी करतायेत. म्हणून पुढच्या दोन दिवसांमध्ये मी निर्णय घेणार आहे. इथे जे स्टेजवर बसलेले आहेत, त्या सर्वांचे काय काम असेल ते सांगितले जाईल. त्याचा पंधरा दिवसाला आढावा घेतला जाईल. जर यामध्ये एखाद्याचा कामचुकारपणा दिसला तर त्याला पदावर ठेवणार नाही. मग त्याला ज्या फुटपाथवर जायचं आहे, त्या फुटपाथवर त्याने जावं," असा इशाराच राज ठाकरेंनी दिला.
"त्यादिवशी मी मुंबईला बैठक लावली होती. त्या बैठकीला काही जण हजर नव्हते, मग जे हजर नव्हते त्यांची हजेरी घेतली. त्यांना विचारलं तर म्हणे प्रयागराजला गेलो होतो. मग गधड्यांनो करताच कशाला पापे. त्यादिवशी बाळा नांदगावकर महाकुंभाचं पाणी घेऊन आले, मला म्हटलं तुम्ही पाणी घ्या, मी म्हटलं हट, असलं पाणी, अरे कशी झालीये ती गंगा, नदी अस्वछता हा कळीचा मुद्दा आहे. आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा," असे म्हणत राज ठाकरेंना महाकुंभाच्या पवित्र स्नानाची खिल्ली उडवली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world