
Raj Thackeray On Jitendra Awhad Gopichand Padalkar Rada: काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची? असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड- गोपीचंद पडळकर यांच्या राड्यावरुन संताप व्यक्त केला आहे.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?'
अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही !
Awhad Vs Padalkar : जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद नेमका काय? कशी झाली सुरुवात?
माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world