जाहिरात

Awhad Vs Padalkar : जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद नेमका काय? कशी झाली सुरुवात?

Awhad Vs Padalkar : जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. "मला मारण्याचा हा डाव होता. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर आम्ही कशाला आमदार राहायचं?

Awhad Vs Padalkar : जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद नेमका काय? कशी झाली सुरुवात?

Awhad Vs Padalkar : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या वादळी ठरताना दिसत आहे. यात आणखी वादाची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या आवारातच जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मात्र आव्हाड विरुद्ध पडळकर हा वाद नेमका कुठून सुरु झाला यावर एक नजर टाकुया. 

आव्हाड विरुद्ध पडळकर वाद नेमका काय?

सर्वात आधी पडळकरांच्या एका वक्तव्यानंतर वाद सुरु झाला. धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवली पाहिजेत. पादरीला ठोकणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस आणि  पादरीचा सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस ठेवलं पाहिजे, प्रक्षोभक वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. पडळकरांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत  जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केला होती. तसेच पडळकरांविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती. यानंतर पडळकरांनी आव्हाड यांच्यावर 'अर्बन नक्षल' म्हणत शाब्दिक हल्ला चढवला होता. 

(नक्की वाचा - Awhad vs Padalkar: विधानभवनात आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, जोरदार राडा)

आव्हाडांची 'मंगळसूत्र चोर' बोलून डिवचलं

यानंतर अधिवेशनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना उद्देशून 'मंगळसूत्र चोर' अशी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर बुधवारी (16 जुलै) रोजी विधानभवनाच्या गेटवरच गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आव्हाडांच्या समर्थकाला (धनंजय देशमुख) लागल्याचा आरोप करण्यात आला. ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांना शिवीगाळही झाली.

गुरुवारी (17 जुलै) या वाद विकोपाला गेला आणि विधानभवनाच्या लॉबीमध्येच आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड सभागृहात भाषण करून बाहेर आल्यानंतर ही घटना घडली. आव्हाडांच्या समर्थकांनी आरोप केला की, पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. आव्हाडांनी त्याआधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत, गोपीचंद पडळकर यांच्या कथित कार्यकर्त्याकडून धमकीचे मेसेज आल्याचा दावा केला. 'गोपी साहेबाच्या नादाला लागला तर तू मेला', 'तुझ्या अंगावर गाडी घालायला पाहिजे होती, पण साहेबांनी घातली नाही,' अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ असलेले मेसेज आल्याचे आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.

(नक्की वाचा - Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांना विधान भवनात असतानाच अश्लील मेसेज, शिवीगाळ अन् थेट धमकी)

जितेंद्र आव्हाडांचा संपात, पडळकरांची दिलगिरी

जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. "मला मारण्याचा हा डाव होता. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर आम्ही कशाला आमदार राहायचं? विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते आमच्यावर हल्ले करणार असतील, तर आम्ही सुरक्षित नाहीत," असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. तर गोपीचंद पडळकर यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com