शरद पवार पक्षाने सिद्धी रमेश कदम (Siddhi Kadam) यांना उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सिध्दी कदम यांच्या उमेदवारीला विरोध करत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी रमेश कदम यांना दिलेला एबी रद्द करावा असे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे.
26 वर्षीय सिद्धी कदम हिला तिकीट दिल्यानं शरद पवार गटाचं कौतुक केलं जात होतं. तरुण उमेदवाराला संधी दिल्याने सिद्धी कदम चर्चेत होती. मात्र अचानक तिचं तिकीट रद्द करण्यात आलं आहे.
सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांची कन्या आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास निगममधील निधीच्या फेरफारचे आरोपी रमेश कदम यांची मुलगी सिद्धी कदमला तिकीट दिल्यामुळे केवळ मोहोळच नाही तर सोलापूर जिल्ह्याला धक्का बसला होता. रमेश कदम सध्या 312 कोटी आर्थिक फेरफार प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. 26 वर्षीय सिद्धी कदम या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या विद्यार्थिनी आहेत.
नक्की वाचा - Mohol Vidhan Sabha : दिग्गजांना सोडून शरद पवारांनी 26 वर्षांच्या सिद्धीला दिलं तिकीट, कोण आहे ही युवा नेता?
मोहोळमध्ये शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय राजू खरे यांना मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने उमेदवारी देऊन शिंदेना मोठा धक्का दिला आहे.
राजू खरे हे मोहोळ मतदार संघात मागील वर्षभरापासून काम करत आहेत. त्यांनी निवडणूकीची जोरदार तयारी केली आहे. येथून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आमदार यशवंत माने यांना पुन्हा संधी दिली आहे.