दुर्वास रोकडे, अमरावती
अमरावतीत जमिनीच्या वादातून शेजाऱ्याने आई आणि मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात वडील देखील जखमी झाले आहेत. अमरावती शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजी नगरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी घटनेनंतर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोन शेजाऱ्यांमध्ये खुल्या भूखंडावरुन अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. मात्र या वादात सोमवारी (29 एप्रिल) दोन जणांची हत्या झाली आहे. शेजाऱ्याने घरात शिरून आई व मुलावर हत्याराने हल्ला करून हत्या केली. तर मध्यस्थी करण्यासाठी गेलेले वडील या घटनेत जखमी झाले आहेत. कुंदा देशमुख (66 वर्ष) आणि सूरज देशमुख (27 वर्ष) अशी मृत मायलेकाचं नाव आहे.
(सुप्रीम कोर्टाने 14 वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे)
लोणारे व देशमुख कुटुंबीयात गेल्या अनेक वर्षांपासून खुल्या भूखंडावरून वाद सुरू होता. सोमवारी पुन्हा याच विषयावरून दोन कुटुंबात वाद झाला. याच रागातून आरोपी देवानंद लोणारे याने विजय देशमुख यांची पत्नी आणि मुलावर हल्ला केला. जेव्हा विजय देशमुख मध्यस्थी करण्याकरिता पोहोचले तेव्हा त्यांच्यावरही आरोपीने हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांची पत्नी आणि मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विजय देशमुख हे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(महादेव बेटिंग अॅप प्रकरण: अभिनेता साहिल खानला अटक, 40 तास पोलीस करत होते पाठलाग)
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी फरार आरोपी देवानंद लोणारे याचा शोध सुरू केला आहे.