अर्जुन गोडगे, धाराशिव
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांच्या प्रचारतोफा धडाडायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारसंघात जोमाने प्रचार सुरू केला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
(नक्की वाचा- 'क्लिन बोल्ड डिपॉझिट गुल' पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी)
हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना फुटल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातो. मात्र एकनाथ शिंदेंचा जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेऊन शिवसेना पक्ष फोडला, असा गौप्यस्फोट ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. आमच्यासोबत येता की जेलमध्ये जाता असा पर्याय एकनाथ शिंदेना देण्यात आला होता. मग त्यांनी ठरवलं जेलमध्ये जाण्यापेक्षा मुख्यमंत्री झालेलं कधीही बरं, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?)
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याबाबत एका भाषणात उल्लेख केला. त्यानंतर आठवडाभरातच अजित पवार महायुतीत सामील झाले. भाजपनं राज्यातील राजकारण नासवलं आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं. युवकांच्या नोकऱ्या मोदींच्या पायाखाली घातल्या. राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले, असे आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केले.