खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला, जवळपास 45 मिनिटे आंदोलनस्थळी थांबले

Manoj Jarange : संदीपान भुमरे जवळपास पाऊण तास मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी उपस्थित होती. भुमरे आणि जरांगे यांच्या बराच वेळ चर्चा झाली.

Advertisement
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी आज सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांची भेट घेतली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संदीपान भुमरे जवळपास पाऊण तास मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी उपस्थित होते. भुमरे आणि जरांगे यांच्यात काही वेळ चर्चा झाली. संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांना 'प्रकृतीची काळजी घ्या, वैद्यकीय उपचार घ्या', असं आवाहन केलं.  

मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी बोलणार आहे. आमच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सांगतो. आम्हाला तुमची गरज आहे. तुमची तब्येत सांभाळा, उपचारांना नकार देऊ नका, डाक्टरांना सहकार्य करा, अशी विनंती संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांना केली.

( नक्की वाचा : रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी )

सरकारकडून मला खेळवणं सुरु

त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 'चर्चा करून गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा डाव आहे, असा अंदाज दिसतो,' असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. माझ्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नसून मला खेळवणं सुरु आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मराठा समाज चांगला हिसका दाखवेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. 

Advertisement

(वाचा - मनोज जरांगे यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी तब्येत खालावली, उपचार घेण्यास मात्र नकार)

मनोज जरांगे यांनी तब्येत खालावली

चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांचा रक्तदाब कमी झाला आहे. तर शरीरातील पाण्याची लेव्हलही कमी झाली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना उपचाराची गरज असून डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून आपल्या मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत.

Topics mentioned in this article