MPSC Paper Leak: "एमपीएससी पेपर फोडणाऱ्यांना ठोकून काढू!" मंत्री उदय सामंत यांचा सडेतोड इशारा

MPSC पेपर फुटी प्रकरणावर राज्य सरकारने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून दोषींना 100% ठोकून काढू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा स्पष्ट इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या एमपीएससी (MPSC) पेपर फुटी प्रकरणावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांना अजिबात सोडले जाणार नाही. पेपर फोडणाऱ्यांना आम्ही ठोकून काढू आणि पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई करू," असा थेट आणि गंभीर इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान सहन केले जाणार नाही, असे सांगत विरोधकांच्या आंदोलनावरही जोरदार हल्लाबोल केला.

"इतर राज्येही आदर्श घेतील अशी मजबूत सिस्टीम उभी करणार"

मंत्री उदय सामंत यांनी एमपीएससीच्या कारभारावर आणि सुरक्षेवर भाष्य करताना खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले. एमपीएससी प्रकरणातील चूक ही शेवटी चूकच आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान अत्यंत दुर्दैवी असून ते सरकार म्हणून अजिबात सहन केले जाणार नाही.

Advertisement

नवा आणि मजबूत कायदा

भविष्यात असा प्रसंग किंवा पेपर फुटीचा गैरप्रकार पुन्हा कधीही घडू नये, यासाठी राज्य सरकार एक अत्यंत मजबूत आणि पारदर्शक सिस्टीम उभी करत आहे. या यंत्रणेचा आणि सिस्टीमचा आदर्श इतर राज्येही घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलिसांमार्फत 100% कारवाई केली जाईल.

रोहित पवारांच्या आंदोलनावर उपरोधात्मक टोला

आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चावर आणि आंदोलनावर बोलताना उदय सामंत यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, "मोर्चा किंवा आंदोलनासाठी सकाळी 9 वाजल्यापासून पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत करत असतात. पण मोर्चा संपत आल्यावर माझ्यासारखा नेता तिथे पोहोचतो आणि हातात झेंडा घेऊन उभा राहतो. मीडियाला आणि सामान्य लोकांना वाटते की, झेंड्याच्या मागे उभी असलेली ही सगळी गर्दी मीच जमवली आहे, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते."

तसेच, "स्पर्धा परीक्षेतील तरुण मुलांच्या भावनांचा आणि भविष्याचा आधार घेऊन कोणीही आपले राजकीय दुकान चालवू नये किंवा राजकारण करू नये," असा टोलाही सामंत यांनी रोहित पवारांचे नाव न घेता लगावला.


Topics mentioned in this article