सौरभ वाघमारे, सोलापूर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे होणारी फसवणूक थांबायचं नाव घेत नाहीय. सोलापूरच्या बार्शीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 22 बनावट अर्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिन्याला दीड हजार रुपये मिळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रे देऊन 22 अर्ज भरून फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
बार्शी तालुक्यात लाडकी बहीण योजनेसाठी 85 हजार अर्ज प्राप्त झाले होते. सर्व अर्जांची शहानिशा केल्यानंतर 22 अर्जांमध्ये बनावट कागदपत्रे वापरल्याचे आढळले आहे. सदर 22 अर्जांची तपासणी केली असता बँक अकाउंट हे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, इतर राज्यातील असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बार्शी तालुक्यातील महिला बाल विकास अधिकारी रेश्मा पठाण यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. या तक्रारीनुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल केला आहे.
(नक्की वाचा- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वैध आहे का? उच्च न्यायालयाचा थेट सवाल)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा रज्जाक यांच्या तक्रारीनुसार लाडकी बहीण योजनेचे येणारे अर्ज यांची पडताळणी करणे, आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे तपासून सदरचे अर्ज हे बरोबर आहेत की नाही याची शहानिशा करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. बार्शी तालुक्यामध्ये सदर योजनेसाठी 85,000 अर्ज आलेले आहेत.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजना मतांसाठीचा जुगाड? भाजप आमदारानेच सांगितली खरी 'भानगड')
अर्जांची पडताळणी करताना माझ्या व माझ्या टीमच्या असे लक्षात आले की, सदर 22 अर्जांमध्ये आधारकार्ड व इतर कागदपत्रे बनावट असल्याची शक्यता आहे. आम्ही वरिष्ठांना देखील याबाबत कल्पना दिली. त्यानंतर तपासणीत असं आढळलं की, सदरचे बँक अकाऊंट उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणीतरी व्यक्तीने सदरचे सर्व अर्ज बनावट कागदपत्राच्या आधारे बनवून लाभ घेण्याचा व सदर योजनेचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, असं रेश्मा रज्जाक यांनी सांगितलं. याप्रकरणी बार्शी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.