आग लागल्यास किंवा कोणत्याही आपत्तीच्या वेळी बचाव कार्यात अनधिकृत पार्किंगमुळे अडथळा निर्माण झाल्यास, आता संबंधित वाहन मालकांवर थेट गुन्हे (FIR) नोंदवले जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी या संदर्भात अत्यंत कठोर निर्देश दिले असून पालिकेने तसा अधिकृत आदेशही जारी केला आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांवर होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो, परिणामी जीवित व वित्तहानीचे प्रमाण वाढते. ही बाब गंभीरतेने घेत प्रशासनाने आता हे कडक पाऊल उचलले आहे.
नक्की वाचा: Badlapur News : 'दररोजचा जीवघेणा प्रवास', वेस्टर्नच्या मुलींकडून सेंट्रलच्या मुलांना लग्नास नकार
निर्णय नेमका काय आहे ?
अग्निशमन दलाच्या गाड्यांना आपत्तीच्या ठिकाणी शीघ्र प्रतिसाद देणे अनिवार्य असते. मात्र, रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृतरित्या उभ्या केलेल्या वाहनांमुळे दलाची सुसज्ज वाहने आणि प्रगत साधनसामग्री वेळेत पोहोचू शकत नाही. आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यापुढे जर एखाद्या आपत्तीच्या ठिकाणी अनधिकृत पार्किंगमुळे मदतकार्यात उशीर झाला आणि तिथे मोठी जीवितहानी किंवा वित्तहानी झाली, तर संबंधित वाहनावर कारवाई केली जाईल.
बेकायदा पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो काढणार
नव्या नियमानुसार, अग्निशमन कार्य पूर्ण झाल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्याने अडथळा ठरलेल्या वाहनाचे नोंदणी क्रमांक नोंदवून वाहनाचे छायाचित्रे काढणे बंधनकारक आहे. वरिष्ठांच्या परवानगीने त्यानंतर तातडीने संबंधित पोलीस ठाण्यात त्या वाहनधारकाविरुद्ध प्रथम खबरी अहवाल म्हणजेच एफआयआर नोंदवण्यात येईल. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये जागृती निर्माण होईल आणि बेकायदा पार्किंगला आळा बसेल, असा विश्वास पालिकेला वाटत आहे.
नक्की वाचा: लेकीच्या रक्षणासाठी बाबा धावला, पण मद्यधुंद तरुणांनी अख्खं कुटुंबच फोडून काढलं; डोंबिवली हादरली
अनधिकृत पार्किंगबद्दल फायर बिग्रेडकडे तक्रार करता येणार
प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी स्पष्ट केले की, जर सामान्य नागरिकांनीही अशा अनधिकृत पार्किंगबाबत तक्रार केली, तर अग्निशमन दल ती तक्रार पोलीस आणि वाहतूक विभागाकडे वर्ग करेल. आपत्तीच्या काळात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि कोणाच्याही चुकीच्या पार्किंगमुळे कोणाचा जीव जाऊ नये, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांनी आपल्या वाहनांमुळे आपत्कालीन सेवांना अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.