राकेश गुडेकर, रत्नागिरी
रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात पूरसदृश परिस्थिती आहे. सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक देखील काही तास ठप्प झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.
सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु असल्याने काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटिशकालीन अंजणारी पुलावरील वाहतूक थांबवली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजापूर शहरात पूरपरिस्थिती
दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचं पाणी जवाहर चौकापर्यंत आलं आहे. शहरातील अर्जुना नदीपात्रात असलेलं पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेलं असून, वरचीपेठ परिसरातील रस्ताही पाण्याखाली गेला आहे.
(नक्की वाचा - रत्नागिरीत जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे; वाहतूक दुसऱ्या पुलावर वळवली)
पुराच्या पाण्यामुळे शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका रोड पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास बाजारपेठेत पुराचं पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत.
अनेक भागात वीज पुरवठा खंडीत
पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठाही काही ठिकाणी खंडीत झाला आहे. काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने पोल व वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन प्रशासनाकडूनही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
(नक्की वाचा: खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांनाच हाती घ्यावे लागले फावडे-घमेले)
जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली
रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीने देखील धोका पातळी ओलांडली. शास्त्री, काजळी, मुचकुंदी आणि कोदवली या नद्यांनी देखील धोका पातळी ओलांडल्याने परिस्थित चिंताजनक बनली आहे. नदी काठाजवळच्या अनेक भात शेतामध्ये शिरलं पाणी आहे. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.