Western Railway: पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने सुरू आहे. पश्चिम मार्गावरील विरार-डहाणू उपनगरीय लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी अप मार्गावरील वाहतूकही उशीरा सुरू आहे. डहाणू स्टेशनवरून चर्चगेटच्या दिशेने निघालेली 6 वाजून 5 मिनिटाची ट्रेनला तब्बल 30 मिनिटे उशीर झाला आहे. तर वलसाड मुंबई सेंट्रल पॅसेंजर ट्रेन देखील 20 मिनिटे उशीराने धावत आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. लोकलसेवा उशीराने सुरू असल्याने ट्रेनमध्येही प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे.
(नक्की वाचा: माळशेज घाटात भीषण अपघात, दरड कोसळून काका-पुतण्याचा जागीच मृत्यू)
पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. पण रेल्वे सेवेवर परिणाम होण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस उशीरा धावत आहेत. यामुळे मेल गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्या थांबवण्यात आल्या होत्या, अशी माहिती मिळत आहे.
(नक्की वाचा: 'NDTV मराठी'चा इम्पॅक्ट; कोस्टल रोडवरील प्रवाशांचा तो संभ्रम दूर)
दरम्यान यापूर्वी पश्चिम रेल्वेची वाहतूक 3 जून रोजी देखील विस्कळीत झाली होती. बोरिवली स्थानकात सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
(नक्की वाचा: VIRAL VIDEO: अटल सेतूवर मनोरुग्णाचा नग्नावस्थेत धिंगाणा, टोल कर्मचारी मेटाकुटीस)