Monsoon Update: उकाड्यापासून लवकरच सुटका! मुंबईकरांनो छत्री काढून ठेवा, मान्सूनबाबत हवामान विभागाची नवीन घोषणा

Monsoon Update: येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र चिंब भिजणार आहे. या नव्या अंदाजामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबत नवी तारीख जाहीर केली आहे.
मुंबई:

Monsoon Update: जून महिन्याचा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. त्यानंतरही ज्याची चातकासारखी वाट पाहिली जात होती, त्या मोसमी पावसाबाबत अखेर सर्वात मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी आणि सोलापूरच्या सीमेवरच रेंगाळलेला मान्सून आता अखेर आपला पुढचा प्रवास सुरू करणार आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या पुढील प्रवासाची नवीन आणि महत्त्वाची तारीख जाहीर केली असून, येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र चिंब भिजणार आहे. या नव्या अंदाजामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाने दिली मान्सूनची नवीन तारीख

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 18 जूननंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक स्थिती निर्माण होत आहे. या पोषक वातावरणामुळे पुढील चार दिवसांत, म्हणजेच 21 ते 22 जून दरम्यान मान्सून पुन्हा एकदा जोरदारपणे सक्रिय होणार आहे. या कालावधीत मान्सून राज्याच्या उर्वरित भागात वेगाने पुढे सरकणार असून, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

अल निनोच्या प्रभावामुळे आगमन लांबले

साधारणपणे दरवर्षी 7 ते 15 जून दरम्यान मान्सून कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात हजेरी लावतो आणि स्थिरावतो. मात्र, यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन बरेच लांबले आहे. इतकेच नव्हे, तर यंदा सरासरी पावसाची टक्केवारी देखील घटण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या पोषक वातावरणाचा अभाव आणि समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण न झाल्यामुळे मान्सूनचा प्रवास खोळंबला होता.

( नक्की वाचा : Kharif Crop Planning: अल निनोच्या संकटात शेती वाचवणार 'हा' फॉर्म्युला; यंदाच्या खरिपात 'या' पिकांची करा निवड )

सध्या मान्सून नक्की कुठे अडकला आहे?

सध्या मान्सूनची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे या भागातच रेंगाळली आहे. सध्या तळकोकण म्हणजेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर परिसरात केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. 

मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये सध्या केवळ ढगाळ वातावरण तयार होत आहे, तर पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाची शक्यता कायम आहे. दुसरीकडे मराठवाडा, उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हा भाग अजूनही पूर्णपणे कोरडाच आहे.

 मराठवाडा आणि विदर्भ भागात हवामान संमिश्र स्वरूपाचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात कमाल तापमान सर्वसाधारणपणे 32 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मात्र, विदर्भात अद्यापही तीव्र उष्णतेची लाट असून अनेक ठिकाणी पारा 35 ते 42 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला जात आहे. ब्रह्मपुरी येथे तर बुधवारी तब्बल 45.5 अंश सेल्सिअस एवढ्या सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, आता या भागात तापमानात आणखी वाढ होणार नाही, असा दिलासा हवामान विभागाने दिला आहे.

( नक्की वाचा : Monsoon Prediction निसर्गाची अद्भूत शक्ती! 'या' पक्ष्याच्या अंड्यांवरून ठरतो मान्सूनचा काळ; वाचा काय आहे पद्धत )

इतर राज्यांमध्येही मान्सूनचा जोर वाढणार

गुरुवार आणि शुक्रवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच पुढील 4 ते 5 दिवसांत कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही मान्सून जोरदारपणे सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या या नवीन तारखेमुळे आता उकाडा संपून लवकरच सुखद गारवा निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Topics mentioned in this article