जाहिरात

मुंबई महापालिकेची 426 घरे कुठे आहेत ? किंमतही निश्चित झाली; फॉर्म भरण्यापूर्वी ही माहिती अवश्य वाचा

BMC Housing Lottery News: शहरातील या घरांची किंमत म्हाडाच्या घरांपेक्षाही जास्त आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

मुंबई महापालिकेची 426 घरे कुठे आहेत ? किंमतही निश्चित झाली; फॉर्म भरण्यापूर्वी ही माहिती अवश्य वाचा

 BMC Housing Lottery Locations And Price:  दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेने सिडको आणि म्हाडाप्रमाणेच अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी ४२६ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. ही घरे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार प्राप्त झाली आहेत. मात्र, शहरातील या घरांची किंमत म्हाडाच्या घरांपेक्षाही जास्त आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. (BMC Housing Project News)

नक्की वाचा: BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी, अर्जापासून सोडतीच्या तारखेसंदर्भातील सगळी माहिती जाणून घ्या

बीएमसीकडून घरांची लॉटरी, अवाढव्य किंमती

उदाहरणार्थ, भायखळ्यातील 270 चौरस फूट क्षेत्राच्या सदनिकेची विक्री किंमत एक कोटी सात लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर कांजुरमार्ग येथील 450 चौरस फूट सदनिकेची किंमत 98 लाखांपासून एक कोटीपर्यंत आहे. महापालिकेला एकूण 186 घरे 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत मिळाली असून, विकास नियंत्रण नियमावली 2034 च्या 33 (२०) (ब) कलमांतर्गत २४० घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीसाठी अर्ज 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत सादर करता येतील.

जाणून घ्या विभागनिहाय सदनिका आणि किंमती |BMC Houses Locations And Price Details

भांडुप 240 सदनिका 63 ते 70 लाखांमध्ये उपलब्ध आहेत, तर कांदिवलीतील 30 सदनिका 63 ते 67 लाखांमध्ये मिळतील. त्या भागातील आणखी चार सदनिका 81 ते 82 लाखांच्या दरात आहेत. दहिसर येथील चार सदनिका 66 लाखांमध्ये, भायखळ्यातील 42 सदनिका एक कोटींच्या किंमतीत, कांजुरमार्गातील 27 सदनिका एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त दराने विकल्या जाणार आहेत. अंधेरीतील 14 सदनिका 78 ते 95 लाखांमध्ये, जोगेश्वरीतील 46 सदनिका 52 ते 57 लाखांमध्ये आणि गोरेगावमधील 19 सदनिका 59 लाखांच्या किंमतीत उपलब्ध असतील.

वेगवेगळ्या भागातील दर आणि त्यावर 10 टक्के प्रशासकीय खर्च याप्रमाणे घरांच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील शीघ्रगणक दर 30 हजार रुपये चौ. फुटांपर्यंत आहेत. त्यामुळे भायखळ्यातील 42 घरांच्या किंमती एक कोटींच्या घरात पोहोचल्यात

कुठे कराल अर्ज?

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही पारदर्शक सोडत प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. या सदनिका अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध असतील, ज्यामुळे मुंबईतील सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. सदनिका विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com