मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सुरु असलेली, प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. राजठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या विधानावरुन राज- उद्धव एकत्र येणार अशा बातम्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. यावरुनच आता राज- उद्धव एकत्र येण्यासाठी सर्वात आधी मोहिम सुरु करणारे, ज्यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही आशीर्वाद दिला होता ते कट्टर शिवसैनिक सतीश वळंजू यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून ठाकरे बंधुंना पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
राज- उद्धव एकत्र येण्यासाठी चळवळ
'2010 साली आम्ही माझी चळवळ मी महाराष्ट्राचा ही चळवळ सुरु केली होती. 2006 मध्ये राजसाहेब शिवसेनेतून बाहेर पडले. आम्ही बोलेपर्यंत याबाबत कोणी सुरुवातही केली नव्हती. आम्ही बोलल्यानंतर एक एक नेते बोलायला लागले. आम्ही पहिल्यांदा मोर्चा काढला, राज ठाकरेंच्या घरी गेलो राज साहेब भेटले नाहीत, उद्धव ठाकरेंच्या घरी गेलो उद्धव साहेब भेटले,' आमची बाजू ऐकून घेतल्याचे सतीश वळंजू यांनी सांगितले.
'आम्ही त्यावेळीही एकच सांगत होतो की मराठी माणसाला आजही मनापासून वाटतं की तुम्ही एकत्र यावे. ही जनभावना आहे त्याचा आदर करा. या जनभावनेचा अनादर कराल तर भविष्यात मागे वळून बघताना कोणीही नसेल. दुर्दैवाने आज दोघांवरही ही वेळ आली आहे.. अशी खंत सतीश वळंजू यांनी बोलून दाखवली.
'मराठी माणसांसाठी एकत्र यावे...'
माझी उद्धव ठाकरेंसोबत भेट झाली होती. पण राज साहेब आजपर्यंत भेटले नाहीत. राज साहेबांना वाटत होते तर त्यांनी माझ्यासारख्या पोटतिडकीने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला एकदा भेट द्यायला हवी होती. आम्हाला त्यांच्याबद्दलही तितकाच आदर आहे जेवढा उद्धव साहेबांबद्दल आहे बाळासाहेबांबद्दल आहे. आम्ही आदित्य ठाकरेंना स्वीकारले, अमित ठाकरेंना स्वीकारले. मी मराठी आहे, शिवसैनिक आहे.. मराठी माणसांच्या भल्यासाठी एकत्र यावे हीच आमची भावना आहे.. असे सतीश वळंजू म्हणाले.
(नक्की वाचा- "मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन", हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बावनकुळे काय म्हणाले?)
'युती नको, पक्ष म्हणून एकत्र या...'
'आत्ता सुरु झालेल्या चर्चा जेन्युअन आहेत की पुन्हा एकदा फुली मारुन सोडून द्यायची. मागच्यावेळी टाळी मागितली ती कधी मागितलेली एबी फॉर्म देऊन झालेले त्यानंतर तुमची ऑफर आलेली. भाजपने पाठिंबा काढून घेतला तेव्हा फार थोडा वेळ राहिलेला. तेव्हा नव्या उमेदवारांचे एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यावेळी एबी फॉर्म मागे घेणं शक्य नव्हतं, भयंकर नाराजी झाली असती. त्यामुळे आता त्या मागच्या गोष्टी सोडा.. दोघांनी युती म्हणून नको पक्ष म्हणून एकत्र या.. विलिनीकरण करा.. कोण कुणाचा नेता हे तुम्ही दोघांनी बसून ठरवा.. महाराष्ट्र तुमच्या दोघांचेही नेतृत्व मानायला तयार आहे..', अशी सादही त्यांनी घातली.
'बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता आशीर्वाद'
'ज्यावेळी मी चळवळ चालू केली तेव्हा बाळासाहेबांनी मला आशीर्वाद दिला होता. बाळासाहेब म्हणाले होते, 'सतीश तू जे काम करतोयस ते राज ठाकरेंसाठी करत नाहीस किंवा उद्धव ठाकरेंसाठी करत नाहीस. हे तू महाराष्ट्रासाठी करत आहेस. हीच भावना माझी आहे, हीच भावना उद्धव साहेबांची आहे, बाळासाहेबांची होती आणि राज ठाकरेंची आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते जेव्हा एकत्र येतील तेव्हा ते फक्त मराठी माणसांची भाषा बोलतील आणि मराठी माणसालाही हा विश्वास आहे.' असेही सतीश वळंजू म्हणाले.
(नक्की वाचा- नाशिकमधील हिंसाचार सुनियोजित, दंगेखोरांवर कडक कारवाई करणार : CM देवेंद्र फडणवीस)