IMD issues red warning for Mumbai: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, घाटकोपर परिसरात पावसाने थैमान घातले असून सखल भागात पाणी साचले आहे. या मुसळधार पावसाचा लोकल सेवा, वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अशातच आता हवामान खात्याने पुढील तीन तासासांठी ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबईसह ठाणे, पालघरला रेड अलर्ट
मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने (IMD) आज, १ जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. दुपारी १२:३० वाजता जारी करण्यात आलेल्या या 'नाऊकास्ट'नुसार, पुढील तीन तासांत या परिसरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत मुंबईतील काही भागांत १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अंधेरी सबवेसह सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बेस्ट बससेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असली तरी, रेल्वे सेवा मर्यादित वेगाने सुरू आहेत. हवामान विभागाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सखल भागांत राहणाऱ्या लोकांनी पाणी साचण्याबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
कल्याण, नवी मुंबईत पावसाची बॅटिंग
कल्याण डोंबिवलीत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. कल्याण शीळ मार्गावर कटाई नाकाजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी वाचल्याने बदलापूर कटाई रस्ता बंद करण्यात आले आहे. त्यासोबतच सलग तिसऱ्या दिवशी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका नवी मुंबईला बसला आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. विशेषतः ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग तसेच अंतर्गत मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Sachin Ahir: बंडखोरीचं बक्षीस! ठाकरेंची माघार; सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world