Thane News: मुरबाडमध्ये खळबळ! आश्रमशाळेत 10 वीच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य; मुख्याध्यापकांवर गंभीर आरोप

Murbad News: कोमल ही मोरोशी येथील आश्रम शाळेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. 25 डिसेंबर रोजी तिने वसतिगृहातील खोलीतच गळफास घेतल्याचे उघड झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. कोमल खाकर असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती 10 वीच्या वर्गात शिकत होती. या घटनेने आदिवासी दुर्गम भागात मोठी खळबळ उडाली असून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?

कोमल ही मोरोशी येथील आश्रम शाळेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. 25 डिसेंबर रोजी तिने वसतिगृहातील खोलीतच गळफास घेतल्याचे उघड झाले. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, शाळेतील अंतर्गत कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभारावर संताप

कोमलच्या मृत्यूनंतर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. मुख्याध्यापकांचा कारभार मुजोर आणि मनमानी स्वरूपाचा असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिस्तीच्या नावाखाली मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या गाद्या काढून घेतल्या होत्या, असा आरोप करण्यात येत आहे. थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांची अशी गैरसोय केल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते.

(नक्की वाचा- पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाटा, वरसोली टोलनाके बंद पाडणार; आमदार सुनील शेळकेंचा इशारा)

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या शाळेला भेट दिली होती. त्यावेळी मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मंत्र्यांनी संबंधित मुख्याध्यापकांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मंत्र्यांच्या तंबीनंतरही मुख्याध्यापकांच्या वर्तनात बदल झाला नसल्याचे आता समोर येत आहे. या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

Advertisement

Topics mentioned in this article