शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli News : अखेर सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावातील नागरिकांना नागपंचमी उत्सवा दिवशी जिवंत नागाची पूजा करता येणार आहे. तब्बल 23 वर्षांनंतर गावकऱ्यांना जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच गावकऱ्यांनी जिवंत नागाची पूजा करण्याची बंद झालेली प्रथा पुन्हा सुरू करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर शिक्षण आणि जनजागृतीच्या उद्देशाने 21 नागराज सापांना पकडण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली आहे.
कशी सुरू झाली जिवंत नागाला पूजण्याची प्रथा?
शिराळा गावकऱ्यांना जिवंत नागाची पूजा करण्याचं वरदान नवनाथ महाराजांकडून मिळालं आहे. हजारो वर्षांपूर्वी नवनाथ महाराज यांच्यापैकी गोरखनाथ महाराज हे शिराळा येथे तपस्या करत असताना दीक्षा मागण्यासाठी हे गावात फिरत होते. गोरखनाथ महाराज ज्या कुटुंबाच्या दारात भिक्षा मागत होते, त्या महिलेला दीक्षा देण्यासाठी थोडा उशीर झाला. त्यावेळी महिलेने वेळ होण्याचं कारण सांगितले. श्रावण महिन्यातल्या पहिल्या सणाला पंचमीला ती मातीच्या नागाची पूजा करत होती. यावेळी महाराजांनी त्या मातीच्या नागावर विभूती स्पर्श करून मातीच्या नागाला जिवंत केलं आणि वरदान दिलं की यापुढे तुम्ही जिवंत नागाची पूजा करा. तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही. गोरखनाथांनी वरदान त्या गावातील महाजन कुटुंबाला दिलं होतं, अशी कथा आहे. त्यानंतर हजारो वर्षांपासून ही परंपरा सुरू झाली.
नक्की वाचा - Nag Panchami 2025: नागपूजनाचे आणि उपवासाचे महत्त्व, नागपंचमी सणाचा इतिहासही जाणून घ्या
गावात मंदिरामध्ये नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करून पुन्हा त्याच ठिकाणी नाग सोडण्याची प्रथा होती. मात्र 23 वर्षापासून न्यायालयाने ही प्रथा बंद केली होती. त्यामुळे शिराळकरांमध्ये नाराजी होती. पण परंपरा जपण्यासाठी नागाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून नाग पकडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिराळकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.