Nagpur News : नागपुरातून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. नागपुरातील रामटेकमध्ये एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक जमा झाले होते. मात्र अंत्यविधीऐवजी महिलेचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या कुटुंबात नेमकं काय घडलं? अंत्यविधीचा कार्यक्रम वाढदिवसात कसा बदलला?
वृद्ध महिलेसोबत नेमकं काय घडलं?
गंगाबाई सावजी साखरे..वय १०३ वर्षे. दोन महिन्यापासून अंथरुणाला खिळलेल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्यावर जगत होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता पसरली. जम्मू-काश्मीर, बालाघाटसह दूरवरील नातेवाईक रामटेकला पोहोचले. अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली होती. पायाची बोटं बांधण्यात आली होती. तोच अचानक आजीने पायाची बोटं हलवली.
आजी जिवंत असल्याचं लक्षात येताच आजूबाजूचं वातावरण बदललं. नेमका त्याच दिवशी १३ जानेवारीला आजीचा वाददिवस होता. आजी जागी होताच तिच्या अंत्यविधीऐवजी नातेवाईकांनी आजीबाईचा वाढदिवसस साजरा केला. आजी सध्या रामटेकच्या आंबेडकर वॉर्डात लेक कुसुमा अंबादे यांच्या घरी राहत आहेत. १२ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शरीराची हालचाल थांबली होती. त्यामुळे कुटुंबीयांना त्या मृत झाल्याचे वाटले.