संजय तिवारी, नागपूर: जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात भरुन पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. उमरेती तालुक्यातील सुरगाव शिवार येथे घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे हा अपघात आहे की आत्महत्या? असाही सवाल आता उपस्थित होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुही पोलीस ठाण्यांतर्गत पाचगाव पोलीस चौकी समोरील भागात गर्ग खदानित पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यातील चार जण एकाच कुटुंबातील आहेत. हे पाचही जण काल रविवार असल्याने त्या भागात फिरण्यासाठी गेले होते. कालपासून हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी नागपूर येथील दोन पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदवली होती.
रोशनी चंद्रकांत चौधरी (वय 32 रा. धुळे) तिचा मुलगा मोहित चंद्रकांत चौधरी (वय 12) मुलगी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (वय 10वर्षे रा. धुळे) बहीण रज्जो राऊत (वय 25 रा. नागपूर) आणि इतिराज अन्सारी (वय 20 वर्षे रा. नागपूर) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या सगळ्यांचा शोध घेत असताना कुही तालुक्यातील त्या जुना खदानीतील लोकेशन मिळून आले. शोध कार्य केले असता त्यांचे पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्राथमिक दृष्ट्या हे सगळे फिरायला आले होते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
दरम्यान, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश असल्याने या मृत्यूप्रकरणाचे गुढही वाढले आहे. या पाचही जणांचा बुडून अपघाती मृत्यू झाला की आत्महत्या केली? असा सवाल उपस्थित होत आहे. कुहू पोलीस याबाबतचा अधिक तपास करत असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.