संजय तिवारी, नागपूर: घरच्यांनी वाढदिवस साजरा केला नाही या कारणावरून रागावून घरातून बाहेर निघून गेलेल्या दहा वर्षीय मुलाला नागपूर पोलिसांनी शोध घेऊन त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन तर केलेच शिवाय वाठोडा पोलीस ठाण्यातील पोलीस काकांनी स्वतः मोठ्ठा केक बोलावून त्याचा वाढदिवस साजरा केला. खाकी वर्दीतल्या या माणुसकीचे आणि संवेदनशील मनाचे दर्शन देणारी ही घटना नागपूरमध्ये घडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतून संचित अरविंद नरड नावाचा 10 वर्ष वयाचा मुलगा गुरुवार 30 जानेवारी रोजी श्रीराम नगर येथील राहत्या घरून सकाळी 11 वाजेपासून गायब झाला होता. मात्र तो बेपत्ता असल्याची माहिती तब्बल पाच तास उशिरा दुपारी 4 वाजता वाजता पोलीस ठाण्यात देण्यात आली.
पालकांनी दिलेली तक्रार घेऊन तात्काळ पोलीस ठाण्याचे संपूर्ण अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेऊन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आली. शोध मोहीम दरम्यान घटनास्थळाचे आजूबाजूला शोध घेत असताना ठिक 55 मिनिटांनंतर हा मुलगा स्वामीनारायण मंदिर परिसराजवळ शशिकांत आणि शैलेंद्रसिंग या दोन पोलिस हवालदाराना मिळाला.
त्याचे घरातून निघून जाण्याचे कारण ऐकून पोलिसांना धक्काच बसला. संचितचा गुरुवार 30 जानेवारीला वाढदिवस होता पण त्याचे घरी सकाळी वाढदिवस साजरा केला नाही म्हणून रागाचे भरात तो घरून निघून गेला होता. मग काय वाठोडा पोलिसांनी संचितला केक खाऊ घालून त्याचे परिवारासोबत हॅपी बर्थडे टू यू गाणे गाऊन त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर असे घरून निघून जाणे कसे वाईट आहे हे देखील त्याला समजावून सांगितले.
नक्की वाचा - Crime news: हत्या की आणखी काही? 32 वर्षाय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, आता...
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांनी दाखवलेल्या माणुसकीचे आणि संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत असून नेटकऱ्यांनी त्यावर भरभरुन प्रतिक्रिया दिल्यात.