जाहिरात

Nalasopara News: कुत्र्याचं नख लागल्याने रेबीज.. 6 महिन्यानंतर चिमुकलीचा मृत्यू; 'ही' चूक तुम्ही करु नका

पीडित कुटुंबाची भेट देत प्रशासनाकडे गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. आगामी महापालिका सभेतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

Nalasopara News: कुत्र्याचं नख लागल्याने रेबीज.. 6 महिन्यानंतर चिमुकलीचा मृत्यू; 'ही' चूक तुम्ही करु नका

मनोज सातवी, प्रतिनिधी:

Nalasopara News:  नालासोपारा परिसरात एक अत्यंत वेदनादायी आणि धक्का देणारी घटना समोर आली आहे. रेबीजच्या संसर्गामुळे अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

इंजेक्शनच्या भितीने दुर्लक्ष केलं, सहा महिन्यांनी उद्भवलं 

कशिश सहानी असे या निष्पाप मुलीचे नाव असून ती नालासोपारा पश्चिमेतील सुबोध सागर इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ती ‘मदर मेरी' शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी आजोबांसोबत जात असताना एका भटक्या श्वानाच्या नखाने तिच्या हाताला जखम झाली होती. दुसऱ्या दिवशी तिला उपचारासाठी नेण्यात आले होते, मात्र इंजेक्शनच्या भीतीमुळे ती अस्वस्थ झाली आणि उपचार पूर्ण होऊ शकले नाहीत. जखम लवकर भरल्याने पुढे त्याकडे दुर्लक्ष झाले.

Toll Waiver: मोठी गुडन्यूज! मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर 3 दिवस टोलमाफी; कसा अन् कोणाला मिळणार लाभ? वाचा....

मात्र काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती अचानक खालावली. अन्न-पाणी घेणे बंद झाले, डोळ्यांमध्ये लालसरपणा दिसू लागला. परिस्थिती गंभीर होताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले, पण डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही तिचे प्राण वाचू शकले नाहीत. वैद्यकीय अहवालात रेबीज संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण 

या घटनेने परिसरातील नागरिकांना मोठा मानसिक धक्का बसला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या श्वानांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट देत प्रशासनाकडे गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. आगामी महापालिका सभेतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही सतर्कता दाखवत संबंधित मुलीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, श्वान किंवा मांजर चावणे अथवा नख लागणे ही बाब अजिबात दुर्लक्षित करू नये. त्वरित उपचार घेणे अत्यावश्यक आहे. विशेषतः लहान मुलांना इंजेक्शनची भीती वाटते, त्यामुळे ते अनेकदा अशा गोष्टी लपवतात. अशावेळी पालकांनी मुलांशी विश्वासाने संवाद साधून त्यांना योग्य वेळी उपचार मिळतील याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Chandrapur News: एका अफवेने नागरिकांची उडाली झोप; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com