पटोलेंच्या कारचा अपघात, घातपाताची शंका; 'त्या' अपघाताची पुन्हा चर्चा

नाना पटोले यांनी या अपघाताबाबत बोलताना म्हटले की, "आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दाम डॅश मारण्याचा प्रयत्न केला. गाडीला एका बाजूने घासत नेलं. आम्ही सुखरूप आहोत मात्र गाडीचे नुकसान झाले. आम्ही तक्रार केली आहे. यामागे काही घातपात आहे का याची पोलीस चौकशी करतील"

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला एका अज्ञात ट्रकने धडक दिली. सुदैवाने या अपघातात नाना पटोले किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. हा अपघात होता का घातपात असा प्रश्न विचारला जात असून, या अपघातासंदर्भात आपण पोलिसांत तक्रार केली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातील गणेशपुर येथील प्रचारसभा संपवून नाना पटोले हे मंगळवारी रात्री परतत असताना त्यांच्या गाडीला एका ट्रकने मागून धडक दिली होती. या अपघातात पटोले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

नाना पटोले यांनी या अपघाताबाबत बोलताना म्हटले की, "आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दाम डॅश मारण्याचा प्रयत्न केला. गाडीला एका बाजूने घासत नेलं. आम्ही सुखरूप आहोत मात्र गाडीचे नुकसान झाले. आम्ही तक्रार केली आहे. यामागे काही घातपात आहे का याची पोलीस चौकशी करतील"

निवडणुकीत खुन्नस येते, म्हणून चौकशी गरजेची
नाना पटोले यांच्या अपघाताच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अशा घटना गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. निवडणुका म्हटल्यानंतर खुन्नस येतेच त्यामुळे पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले. प्रचार काळात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना अधिकची सुरक्षा पुरवली पाहिजे असेही ते म्हणाले. 

संजय राऊत नानांचे दुश्मन!

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी या घटनेचा महाविकास आघाडी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करण्यासाठी आधार घेतला.

संजय शिरसाटांनी म्हटले की, "याबाबत आमच्या मनात संजय राऊत यांच्या नावाची पाल चुकचुकते आहे, कारण या आघाडीमधील नानांचा सगळ्यात मोठा दुश्मन, विरोधक असेल तर ते संजय राऊत आहेत. म्हणून याची पोलीस चौकशी झाली पाहिजे आणि यामागे कोण आहे त्याचा शोध घेतला पाहिजे." 

'त्या' अपघाताची चर्चा  

नाना पटोले यांच्याप्रमाणेच स्वत:च्या कारने जात असताना शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला होता.  14 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला होता आणि या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला होता. 2022 साली हा अपघात झाला होता आणि मेटे यांची कार ट्रकवर आदळल्याने मेटे यांचा मृत्यू झाला होता. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक होती. त्यावेळी मेटेंच्या अपघाती निधनामागे घतपाताची शक्यता वर्तवण्यात येत होती. नाना पटोलेंसोबत घडलेल्या दुर्घटनेतून पटोले सुखरूप बचावले. मात्र या अपघाताचे वृत्त ऐकल्यानंतर अनेकांना मेटेंच्या अपघाताच्या घटनेची आठवण झाली. 
 

Advertisement
Topics mentioned in this article