योगेश लाठकर, प्रतिनिधी
LPG Gas Crisis: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतातही एलपीजी गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना रांगा लावाव्या लागत आहेत. गॅसचे दर आणि उपलब्धतेमुळे अनेक घरांचे बजेट कोलमडले आहे. त्याचवेळी नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंब मात्र या सर्व त्रासातून पूर्णपणे मुक्त आहे. विशेष म्हणजे, या कुटुंबात तब्बल 35 सदस्य आहेत, तरीही गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी एकदाही एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी केलेला नाही.
नांदेड जिल्ह्यातील सिंधी गावातील पुयड कुटुंबाची ही यशोगाथा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्या काळात गॅससाठी वणवण करावी लागत आहे, अशा वेळी हे मोठे कुटुंब 'नो टेन्शन' मोडमध्ये कसे, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर दडले आहे त्यांच्या जिद्दीत आणि प्रल्हाद पुयड यांनी 15 वर्षांपूर्वी घेतलेल्या एका निर्णयामध्ये.
( नक्की वाचा : Sambhajinagar News: गॅस नाही म्हणून आता चुलीवर तयार होणार औषध; संभाजीनगरमधील उद्योजकांसमोर मोठे संकट )
काय आहे आयडिया?
पुयड कुटुंबाचे प्रमुख प्रल्हाद पुयड यांनी 15 वर्षांपूर्वी आपल्या घरी गोबर गॅसची निर्मिती केली. ग्रामीण भागात राहत असल्याने त्यांनी नैसर्गिक संसाधनाचा वापर करण्यावर भर दिला. तेव्हापासून आजपर्यंत या घराचे किचन कधीही एलपीजी गॅसवर अवलंबून राहिले नाही. 35 सदस्यांच्या या मोठ्या कुटुंबासाठी लागणारा सर्व स्वयंपाक केवळ आणि केवळ याच गोबर गॅसवर तयार केला जातो. यामुळे गॅसच्या वाढत्या किमती आणि तुटवड्याचा या कुटुंबावर कोणताही परिणाम झालेला नाही.
पुयड कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि त्याला जोडधंदा म्हणून त्यांनी दुधाळ जनावरे पाळली आहेत. या जनावरांच्या शेणापासून दररोज गोबर गॅस तयार केला जातो. या प्रक्रियेचा फायदा केवळ इंधनापुरता मर्यादित नाही. गोबर गॅससाठी वापरलेले शेण नंतर उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खत म्हणून शेतात वापरले जाते. यामुळे रासायनिक खतांचा खर्च वाचतो आणि जमिनीचा कसही सुधारतो.
( नक्की वाचा : Manmad: युद्धामुळे देशात गॅस टंचाई, पण मनमाडच्या गुरुद्वारामध्ये हजारोंचा स्वयंपाक होतोय बिनधास्त; वाचा कसं? )
सुरक्षित आणि चविष्ट स्वयंपाक
या कुटुंबातील महिला सदस्यांच्या सांगितलं की, गोबर गॅसवर तयार केलेला स्वयंपाक हा एलपीजी गॅसवरील स्वयंपाकापेक्षा अधिक स्वादिष्ट लागतो. कुंताबाई पुयड सांगतात की, हा गॅस वापरणे अत्यंत सुरक्षित आहे. जेव्हा आजूबाजूची मंडळी गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे त्रस्त असतात, तेव्हा हे कुटुंब मात्र अगदी बिनधास्तपणे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करत असते. प्रणाली पुयड यांनीही या नैसर्गिक ऊर्जेच्या वापरामुळे कुटुंबाची मोठी आर्थिक बचत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world