जाहिरात

Sambhajinagar News: गॅस नाही म्हणून आता चुलीवर तयार होणार औषध; संभाजीनगरमधील उद्योजकांसमोर मोठे संकट

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील औषध निर्मिती उद्योगासमोर सध्या इंधन टंचाईचे एक अभूतपूर्व संकट उभे ठाकले आहे.

Sambhajinagar News: गॅस नाही म्हणून आता चुलीवर तयार होणार औषध; संभाजीनगरमधील उद्योजकांसमोर मोठे संकट
Chhatrapati Sambhajinagar News: औषध कंपन्यांनी चक्क आदिमानवाच्या काळातील तंत्राचा आधार घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील औषध निर्मिती उद्योगासमोर सध्या इंधन टंचाईचे एक अभूतपूर्व संकट उभे ठाकले आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचे चटके थेट मराठवाड्याच्या औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचले असून गॅस पुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे. जीवनरक्षक औषधे बनवण्यासाठी लागणारी वाफ तयार करायची कशी, असा यक्षप्रश्न उद्योजकांसमोर होता. मात्र, उत्पादन थांबले तर रुग्णांना औषधे मिळणार नाहीत आणि कोट्यवधींचे नुकसान होईल, या भीतीने आता औषध कंपन्यांनी चक्क आदिमानवाच्या काळातील तंत्राचा आधार घेतला आहे.

हायटेक लॅबमध्ये पेटली चूल

वाळूज औद्योगिक वसाहतीमधील रेडक्रॉस फॉरम्युलेशन कंपनीत सध्या एक वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी अत्याधुनिक गॅस पाईपलाईन्स आणि हायटेक यंत्रणा असायला हवी होती, तिथे आता विटांची मोठी चूल रचण्यात आली आहे. औषध निर्मितीसाठी वाफ म्हणजेच स्टीम तयार करणे अनिवार्य असते. 

गॅस नसल्याने ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. यावर उपाय म्हणून कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी कानरे यांनी नाईलाजास्तव चुलीवर बॉयलर गरम करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रात्रीतून चूल तयार करण्यात आली असून आता लाकूड-फाटा पेटवून त्यावर औषधे तयार केली जाणार आहेत.

( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांचे मोठे यश! महागड्या LPG ला रामराम; आता घरच्या घरी तयार होणार गॅस! वाचा काय आहे संशोधन )
 

वाफ तयार करण्यासाठी मोठी कसरत

हा जुगाड पाहताना कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, पण उद्योजकांपुढे दुसरा पर्याय उरलेला नाही. बॉयलरच्या खाली मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडे लावून आग पेटवली जाते. या आगीच्या उष्णतेने बॉयलरमधील पाणी उकळले जाते आणि त्यातून निर्माण होणारी वाफ औषध बनवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरली जात आहे. 

गॅसच्या एका बटणावर जे काम सहज व्हायचे, त्यासाठी आता कामगारांना तासनतास धुराशी झुंज द्यावी लागत आहे. आपण बाजारातून विकत घेणारे औषध आता चक्क चुलीवर तयार होण्याची वेळ आली आहे, ही औद्योगिक क्षेत्रातील मोठी शोकांतिका मानली जात आहे.

( नक्की वाचा : KDMC News: कल्याण डोंबिवलीत कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात मोठा झोल; मुदत नसतानाही पालिकेनं उधळले लाखो रुपये! )

औषध कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात

छत्रपती संभाजीनगरमधील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये औषध निर्माण करणाऱ्या एकूण 78 कंपन्या आहेत. यातील 50 टक्के कंपन्या लघु आणि मध्यम स्वरूपाच्या आहेत. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे सध्या 8 ते 10 कंपन्यांचे काम पूर्णपणे थांबले आहे. तर उर्वरित कंपन्यांकडील गॅसचा साठा अवघ्या 2 दिवसांत संपणार आहे. 

सरकारने तातडीने औषध कंपन्यांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला नाही, तर बाजारपेठेत औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com