योगेश लाटकर, नांदेड
नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह गोदावरी नदीच्या पात्रात कार घालून आत्महत्या केली. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी या शिक्षकाने आपल्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवले होते, ज्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह राज्याच्या शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
चिमुकल्यांसह संपवली जीवनयात्रा
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव सुनील मोरे असे आहे. ते मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी होते. मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील 'पोटा बुद्रुक' येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते.
(नक्की वाचा- NCP News: राज्याच्या राजकारणात पु्न्हा भूकंप? राष्ट्रवादीत फूट की विलिनीकरण? दोन्ही NCP मध्ये काय सुरूये?)
सुनील मोरे यांनी मुदखेड जवळील आमदुरा येथील गोदावरी नदीच्या पात्रात आपली कार वेगाने घातली. या कारमध्ये त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सारा आणि मुलगा सुमित हे दोन चिमुकले देखील होते. या भीषण घटनेत तिघांचाही जागीच बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने शर्थीचे प्रयत्न करून गोदावरी नदीच्या पात्रातून कार आणि त्यामधील तिन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
व्हॉट्सॲप स्टेटस ठरले 'सुसाईड नोट'
सुनील मोरे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलवर ठेवलेले व्हॉट्सॲप स्टेटस आता समोर आले असून, तेच एक प्रकारे त्यांची डेथ नोट ठरली आहे. या स्टेटसमध्ये त्यांनी आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. हदगावचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला आणि जाचाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी या स्टेटसमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.