NDTV Marathi Impact : नंदुरबारच्या आदिवासी शेतकऱ्यासाठी उपमुख्यमंत्री आले धावून, आयुष्यावरील मोठं ओझं केलं दूर

NDTV मराठीवर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली दखल. अखेर नंदूरबारच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी

Nandurbar News : सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यातच नंदूरबारमधील एक शेतकऱ्यासमोर ऐन हंगामात मोठं संकट उभं राहिलं होतं. शेतकऱ्याच्या बैल जोडीमधील एक बैल अचानक दगावला. शासनाकडे विनवण्या करुनही काहीच हाती लागलं नाही. शेवटी शेतकऱ्याने स्वत:लाच नांगराला जुंपून शेती सुरू केली. NDTV मराठीच्या माध्यमातून शेतकऱ्याची व्यथा दाखविण्यात आली होती. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी NDTV मराठीच्या वृत्ताची दखल घेतली आणि शेतकऱ्याला मदत पुरवली.

थेट उपमुख्यमंत्री शेतकऱ्याच्या मदतीसाठी आले धावुन...

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमन येथील सोत्या वसावे या आदिवासी शेतकऱ्यावर बैल दगावल्यामुळे स्वतः नांगराला जुंपून शेती करण्याची दुर्दैवी वेळ आली होती. ही बातमी NDTV मराठी ने प्रसारित केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी तातडीने जिल्हाप्रमुख राम रघुवंशी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना शेतकर्‍याला बैल खरेदी करून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, धडगाव येथे सोत्या वसावे यांना नवीन बैल सुपूर्द करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्याशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या आणि पुढील मदतीचे आश्वासन दिले. या मदतीबद्दल शेतकऱ्याने उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Advertisement

नक्की वाचा - Nandurbar News : ऐन हंगामात बैल दगावला, पण मदत मिळेना; अखेर आदिवासी शेतकऱ्याने स्वतःला जुंपलं नांगराला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आदिवासी शेतकऱ्याला बैल मिळाला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शिंदे यांच्या आदेशाने आमदार चंद्रकात रघुवंशी जिल्हाप्रमुख यांनी तातडीने बैल खरेदी करत शेतकऱ्याकडे सुपूर्द केला. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैल दिल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.