प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमन येथील सोत्या रोमा वसावे या कर्जबाजारी आदिवासी शेतकऱ्यावर अत्यंत हलाखीची वेळ आली आहे. शेतीचा मुख्य आधार असलेला बैल दगावल्यानंतर, त्यांनी नवीन बैल खरेदीसाठी शासनाकडे सानुग्रह अनुदानासाठी वारंवार अर्ज केले. पशुवैद्यकीय विभागाने पंचनामा आणि शवविच्छेदन करून अहवाल सादर करूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही.
योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर
पेरणीच्या हंगामात शेती थांबवणे या कर्जबाजारी कुटुंबाला परवडणारे नव्हते. अखेर, हतबल होऊन सोत्या वसावे यांनी स्वतःला नांगराला जुंपले. तर त्यांच्या पत्नीने नांगर धरून शेतीची कामे पूर्ण केली. या घटनेमुळे आदिवासींच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. तहसीलदार विनायक घुमरे यांनी कर्मचारी प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याचे कारण देत मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र, या घटनेने प्रशासकीय यंत्रणेच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून पीडित शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी जलद यंत्रणेची गरज व्यक्त होत आहे.
राज्याच्या अनेक भागात पेरण्यांचं घटलेलं प्रमाण, जुलै महिना मध्यावर आला तरी पाऊस न पडल्याने निघून गेलेली पेरणीची वेळ, आणि जिथे पाऊस पडला तिथे बोगस बियाण्यांमुळे असलेलं दुबार पेरणीचं संकट या सगळ्या बाबी पाहता यंदाच्या खरिप हंगामात धान्यउत्पादन घटणार हे सांगण्यासाठी कुणा कृषीतज्ज्ञांची गरज नाही. त्यामुळे आता पावसाऐवजी शेतकऱ्यांची भीस्त सरकारवर अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारला आतापासूनच नियोजन करावं लागणार आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world