Sudhakar Badgujar BJP Entry: कडाडून विरोध, हायहोल्टेज ड्राम्यानंतर अखेर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये ुभाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजप आमदार सीमा हिरे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून त्यांची भाजपमध्ये एन्ट्री झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजप नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह 14 माजी नगरसेवक, 4 मंडल अध्यक्ष यांचा विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. सुधाकर बडगुजर मोठे शक्तीप्रदर्शन करत मुंबईमध्ये दाखल झाले होते. आज दोन वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
"भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचं मी आभार मानतो. गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकट मोचक आहेत. आपत्ती आली की ते मार्ग काढतात. माझ्या बाबतीत त्यांनी तसा मार्ग काढला. मी समाजासाठी झटतो.अचानक नितीने घात घातला आणि पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो महापालिका निवडणूकीत दूध का दूध और पानी का पानी होईल," असे म्हणत भाजप प्रवेशानंतर ठाकरे गटाला थेट इशारा दिला.
दरम्यान, निवडणूका सामोर आहेत, नाशिक आपला बालेकिल्ला आहे. आता 100 पार नगरसेवक आपल्याला करायचे आहेत. सर्व मिळून प्रयत्न करूया. आता या उरल्या सुरल्या पक्षात कोणीही राहिलेले नाही. पुढच्या काळात अनेक बडे चेहेरे आमच्यासोबत येतील. मी वर शब्द दिला आहे की सर्व महापालिका आपल्याकडे एकहाती घ्यायची आहे, असे म्हणत गिरीश महाजन यांनी पालिका निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.