
70 च्या दशकातील गाजलेल्या 'आनंद' चित्रपटातील एक डायलॉग खूप फेमस आहे. तो म्हणजे, एजिंदगी और मौत ऊपरवाले के हाथ है जहांपनाह. उसे न आप बदल सकते हैं न मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं. जिनकी डोर ऊपरवाले की ऊंगलियों में बंधी हैं. कब कौन कैसे उठेगा, यह कोई नहीं बता सकता है.' अहमदाबाद विमान अपघातानंतर या ओळी खऱ्या ठरल्या आहेत. मनी ध्यानी नसताना या अपघातात काहींचा जीव गेला तर काहींना नशिबाने या अपघातापासून वाचवले. अहमदाबाद विमान अपघातानंतर अशा अनेक हृदयद्रावक आणि धक्कादायक कथा समोर येत आहेत. त्यावर एखाद्याला विश्वास ठेवणे ही कठीण आहे.यमन व्यास यांची ही अशीच एक अंगावर काटा आणणारी कहाणी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यमन व्यास त्यांनी आपली बॅग पॅक केली होती. ते फक्त घरातून लंडनला जाणारी ती फ्लाइट पकडण्यासाठी निघत होते. आईचा निरोप घेण्याचा क्षण होता. भावनिक झालेल्या आईने मुलाला गुजरातीमध्ये म्हटले- "थोडा दिवस रोकाई जा ने बेटा" म्हणजेच काही दिवस आणखी थांब ना बेटा. आईच्या भावनांमुळे यमनचे पाय मागे सरकले. आईचा शब्द तो मोडू शकला नाही. त्यांने लंडनला त्या दिवशी जाणे टाळले. त्यांचे 12 जूनचे एअर इंडियाच्या त्याच फ्लाइटचे तिकीट होते. ते उड्डाणाच्या काही सेकंदातच जमिनीवर कोसळले. नकळतपणे आईने मुलाला मृत्यूच्या दाढेतून परत खेचले.
यमनने सांगितले की, संध्याकाळी जेव्हा त्यांनी विमान अपघाताची बातमी ऐकली, तेव्हा ते स्तब्ध झाले. आईने त्यांचा जीव वाचवला होता. इंग्रजी वृत्तपत्र 'टाइम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार, यमन अनेक वर्षांपासून यूकेमध्ये काम करत आहे. ते लंडनमध्ये एका वेअरहाऊसमध्ये काम करतात. जवळपास दोन वर्षांनी यमन आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी वडोदऱ्याला आले होते. कुटुंबासोबत सुट्ट्या घालवल्यानंतर ते परत लंडनला जाणार होते. पण आईच्या सांगण्यावरून ते थांबले आणि त्यांचा जीव वाचला.
जैमिनी आणि प्रिया पटेलची कथा
जैमिनी आणि प्रिया पटेलच्या नशिबातही काहीतरी वेगळेच लिहिले होते. अहमदाबादच्या चांदलोडिया येथील 29 वर्षीय जैमिन पटेल आणि 25 वर्षीय प्रिया पटेल यांना त्यांच्या मित्राने सुट्ट्या घालवण्यासाठी लंडनला बोलावले होते. हे दोघेही गुरुवारी अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या बोइंग 787-8 ड्रीमलायनर विमानाने लंडनला जाणार होते. खरेतर ते व्हिजिटर व्हिसावर फिरायला जात होते. पण त्यांच्याकडे काही कागदपत्रे कमी होती. त्यामुळे त्यांना विमानात बसू दिले नाही. ते एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना विनवणी करत राहिले. पण त्यांना बोर्डिंग करू दिले नाही. ते निराश होऊन घरी परतले. जेव्हा ते घरी पोहोचले, तेव्हा त्यांना अपघाताची माहिती मिळाली. तो त्यांच्यासाठी मोठा धक्का होता.
भूमी चौहानची सुटका
अशाप्रकारे, ब्रिटनमध्ये राहणारी भूमी चौहान अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाची फ्लाइट चुकल्यामुळे वाचली. ती तिच्या नशिबासाठी देवाचे आभार मानत आहे. भूमी अहमदाबादच्या प्रचंड ट्राफीकमध्ये अडकली. यामुळे तिला विमानतळावर पोहोचायला उशीर झाला. फक्त 10 मिनिटांच्या अंतराने भूमीला नवीन जीवन मिळाले.
विमानातून वाचलेला एकमेव प्रवासी
गुजरातमध्ये अहमदाबाद विमानतळाजवळ गुरुवारी अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानातून फक्त एकच प्रवासी या भीषण घटनेतून जिवंत वाचला. शहरातील सिविल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विश्वकुमार रमेश नावाचा हा प्रवासी बोइंग 787 ड्रीमलायनरच्या 'ए11' सीटवर होता. या विमानात 242 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. एअर इंडियानुसार, विमानात असलेल्या 230 प्रवाशांपैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक होते. या अपघातात विजय रूपाणी यांचेही निधन झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world