Nashik News : जागतिक स्तरावर धुमसणाऱ्या युद्धज्वाळांचा फटका आता थेट नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांना आणि निर्यातदारांना बसू लागला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नाशिकची गोड द्राक्षे परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच बंदरांवर अडकून पडली आहेत.
परिस्थिती इतकी गंभीर आहे की, नवी मुंबईतील JNPT बंदरावरून रवानगी झालेले अनेक कंटेनर आता पुन्हा माघारी फिरू लागले आहेत. द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील चित्र सध्या चिंतेचे बनले असून, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे.
काय आहे परिस्थिती?
गेल्या 10 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय निर्यातीवर गंडांतर आले आहे. नाशिकमधून दुबईसाठी रवाना झालेला द्राक्षांचा एक मोठा कंटेनर युद्धामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे पुन्हा निफाडमध्ये परत आला आहे. निफाड तालुक्यातील सांगळे ऍग्रो प्रोसेस या कोल्ड स्टोरेजमध्ये 13 मेट्रिक टन द्राक्षांनी भरलेला हा कंटेनर सध्या पुन्हा उतरवून ठेवावा लागला आहे.
शिपिंग कंपन्यांनी सध्याच्या परिस्थितीमुळे वॉर रिस्क चार्ज लागू केला आहे, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च भरमसाठ वाढला आहे. द्राक्ष हे नाशवंत फळ असल्याने ते वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते, मात्र या विलंबामुळे माल खराब होण्याची भीती निर्यातदार अक्षय सांगळे यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : US Iran War : इराणने स्वतःच्याच जनरलची केली हत्या ! वाचा ऐन युद्धात का उचललं खळबळजनक पाऊल? )
म्हणून वाढला खर्च
कंटेनर पुन्हा माघारी आल्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच होत नाहीये, तर साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात द्राक्षांचा साठा असताना, आता परत आलेल्या मालामुळे क्षमतेवर प्रचंड ताण पडत आहे.
कोल्ड स्टोरेजचे मालक संजय सांगळे यांच्या मते, माघारी आलेला माल पुन्हा साठवायचा कुठे आणि नवीन येणाऱ्या मालासाठी जागा कशी उपलब्ध करायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. यासोबतच मजुरांचा खर्च, वीज बिल आणि वाहतुकीचा अतिरिक्त भार यामुळे निर्यातदार आणि कोल्ड स्टोरेज मालक दुहेरी संकटात सापडले आहेत.
द्राक्ष उद्योगावर आर्थिक संकट गडद
नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनात जगात अग्रेसर आहे. दरवर्षी येथून हजारो टन द्राक्षे युरोप आणि आखाती देशांमध्ये निर्यात केली जातात. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादनात मोठी घट झाली होती. आता कुठे शेतकरी सावरत असताना युद्धाच्या परिस्थितीने त्यांच्या अडचणीत भर घातली आहे.
ही युद्धस्थिती लवकर निवळली नाही, तर नाशिकच्या द्राक्ष उद्योगाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निर्यात कधी सुरळीत होईल याबाबत सध्या कोणतीही स्पष्टता नसल्याने बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.