Nashik News : भाजप शहराध्यक्षांचा अतिउत्साह पडला महागात; नाशिकमध्ये महायुतीच्या सहल रणनीतीला पहिला 'धक्का'

नाशिकमध्ये भाजपच्या शहराध्यक्षांचा अतिउत्साह महागात पडल्याची चर्चा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik News : नाशिक विधान परिषद निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालली असून राजकीय आखाड्यात आता हॉटेल पॉलिटिक्सही चांगलंच चर्चेत आलं आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचे तगडे आव्हान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणताही दगा-फटका होऊ नये यासाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याचं बोललं जात आहे.

याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या मतदारांना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील रिसॉर्टमध्ये मुक्कामासाठी हलविण्यात येत आहे. अधिकृतपणे मात्र वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि निवडणुकीची रणनीती समजावून सांगण्यासाठी ही सहल आयोजित करण्यात आल्याचे स्थानिक पदाधिकारी सांगत आहेत. शनिवारी शिंदे सेनेचे नगरसेवक रवाना झाल्यानंतर सोमवारी भाजपचे नगरसेवकही भिवंडीकडे रवाना झाले. दरम्यान भाजपने निवडणुकीत शिस्तीचा डोस देत शहरातील सर्व ७२ नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनाच मतदान करण्याचे आदेश दिले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे व्हीप जारी करताना नरेंद्र दराडे स्वतः उपस्थित होते.

Advertisement

नक्की वाचा - Nashik News : नाशिकपासून 30 किमी अंतरावरील शहराचं रुप पालटणार, गुंतवणूक वाढली; जमिनीचे भाव पाहून धक्काच बसेल!

शहराध्यक्षांनी चालकाला खाली उतरून घेतला बसचा ताबा...

मात्र यानंतर घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. नगरसेवकांना घेऊन जाणाऱ्या बसभोवती प्रसारमाध्यमांनी गर्दी केल्यानंतर शहराध्यक्ष सुनील केदार यांनी थेट चालकाला खाली उतरवून अलिशान अशा बसमध्ये स्वतः ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला. मात्र हा अतिउत्साह महागात पडल्याची चर्चा रंगली. बस सुरू होताच हॉटेलच्या आवारातील भिंतीला बसची धडक बसली. या अपघातात बसचे किरकोळ नुकसान झाले तर भिंतीचाही एक कोपरा तुटल्याचं सांगितलं जात आहे. निवडणुकीपूर्वी मतदारांच्या ‘मार्गदर्शन सहली'पेक्षा शहराध्यक्षांच्या ड्रायव्हिंगचीच अधिक चर्चा रंगली. त्यामुळे मतदानाआधीच महायुतीच्या सहल रणनीतीला पहिलाच धक्का बसल्याची कुजबुज हॉटेल परिसरात ऐकायला मिळत होती.

Topics mentioned in this article