Manmad Water Crisis: नाशिकमधील मनमाड येथे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडून 20 ते 22 दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना काटकसरीने पाणी वापरावे लागत आहे. यातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणामध्ये मे महिन्याअखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावरच मनमाडच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे.आवर्तन मिळाले नाही तर मनमाडकरांना भीषण पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.
(नक्की वाचा: संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळतंय, निवडणुका संपल्याने सरकारने आता त्याकडे लक्ष द्यावे : नाना पटोले)
वागदर्डी धरण पडले कोरडेठाक
गेल्या तीन दशकांपासून सुमारे सव्वालाख लोकवस्तीच्या मनमाड शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून मनमाड शहराला भीषण पाणीटंचाई सोसावी लागत आहे. भूजल पातळी खालवली, कुपनलिकाही आटल्याने संपूर्ण वर्षभर मनमाडला पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर पाणी पुरवठा अवलंबून होता. पालिकेकडून 20 ते 22 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. पाणी साठवण्यासाठी प्रत्येक घरासमोर प्लास्टिकच्या टाक्या पाहायला मिळत आहे. इतके करूनही पाणी पुरत नसल्याने टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेटही कोलमडत आहे.
(MLA P. N. Patil: काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास)
शहरामध्ये युद्धजन्य परिस्थिती
पाणीटंचाईसाठी मनमाड देशभरात कुप्रसिद्ध आहे. महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने पाणी आल्यानंतर शहरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. घरातील सर्वच सदस्यांची पाणी भरण्यासाठी लगबग सुरू असते. घरातील प्रत्येक भांडे भरून ठेवले जाते. पाचवीला पुजलेल्या पाणीटंचाईमुळे मनमाडमध्ये लोक स्वतःच्या घरातील मुली देखील देत नसल्याने अनेक मुलांचे लग्न होत नाहीये. मनमाडच्या माथी असलेला पाणीटंचाईचा काळा टिळा कधी पुसला जाईल? असा प्रश्न मनमाडकर विचारताहेत.
सध्या वागदर्डी धारणामध्ये उपलब्ध मृत साठ्यातून मनमाडला 20 ते 21 दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. मात्र हा पाणीसाठाही संपुष्टात आला आहे. पालखेडचे आवर्तन मिळाले नाही तर पाण्याचे दिवस वाढवून महिनाभराने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
पाणीप्रश्न हायकोर्टात
मनमाड पाणीप्रश्न थेट हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. पाणीप्रश्न सुटावा यासाठी उच्च न्यायालयातही जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. अनेक पंचवार्षिक पाणीप्रश्नावर सर्वच राजकीय पक्ष आणि लोक प्रतिनिधीकडून राजकारण झाले. मात्र आता मनमाड शहरासाठी संजीवनी ठरलेली करंजवण-मनमाड थेट जलवाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे ही योजना मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत आहे. सहा महिन्यामधअये ही योजना मार्गी लागण्याची आशा आहे. ही योजना मार्गी लागल्यास मनमाडचा पाणीप्रश्न कायम सुटण्यास मदत होणार आहे. ही योजना तातडीने पूर्ण होण्याची तहानलेल्या मनमाडकरांना आस लागली आहे.
(नक्की वाचा: अमरावतीच्या शेतकऱ्यांचे अनुदान गेलं काश्मीरात, नक्की काय घडलं?)