निलेश वाघ, नाशिक: स्मशानातील सोन्यासाठी मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर रक्षा व अस्थी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार सटाणा तालुक्यातील नामपूर येथे उघडकीस आला. रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमी पोहोचल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सटाणा तालुक्यातील नामपूर गावातील सुरेखा दीपक खैरनार (वय 40) यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांच्यावर नामपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अस्थी संकलन व रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेल्यावर अस्थी व रक्षा गायब असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी राख चोरल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून हा प्रकार केवळ चोरीचा आहे की अघोरी क्रियेचा याबाबत अजूनही स्पष्टता नाही. हिंदू परंपरेनुसार, विवाहित महिलेला अंत्यसंस्कारावेळी दागिने घालण्याची पद्धत आहे. यामुळे अनेक वेळा अस्थी संकलन करताना राखेत दागिने सापडतात..या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(नक्की वाचा- Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)
महत्त्वाचे म्हणजे याआधीही अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंत उभारावी, नशेखोरी व अघोरी प्रकारांना आळा घालावा तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
(नक्की वाचा- Joe Biden : अमेरिकेच माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण, हाडांमध्ये पसरल्याने चिंता)