नवी मुंबई: नवी मुंबई शहर देशात स्वच्छ, सुंदर आणि सुटसुटीत शहर म्हणून ओळखले जाते. खाडीकिनाऱ्याचे सौंदर्य, उद्यानांची हिरवळ आणि ‘ग्रीन अँड फ्लेमिंगो सिटी' म्हणून मिळालेला बहुमान हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. मात्र हेच शहर आता सिमेंटच्या जंगलात रूपांतरित करण्याचे पाप सिडको करीत असल्याचा आरोप होत आहे. कारण, नवी मुंबई महापालिकेने विकास आराखड्यात आरक्षित केलेल्या जागा सिडकोने बिल्डर्सना विकल्या आहेत.
सिडकोने ३१ जुलै रोजी काढलेल्या भूखंड लॉटरीतून कोट्यवधी रुपये मिळवले. या सोडतीत एकूण ४८ भूखंडांचा समावेश होता. विशेष म्हणजे, नेरूळ सेक्टर २८ मधील ५.५ एकर क्षेत्रफळाच्या चार भूखंडांवर महापालिकेचे आरक्षण असतानाही सिडकोने ते विक्रीस काढले. संबंधित भूखंड म्हणजे फ्लॅट नंबर १२ A, B, C, D असून, महापालिकेने यावर खालीलप्रमाणे आरक्षण ठेवले आहे.
१२A – सार्वजनिक मैदान
१२B – ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग केंद्र
१२C – उद्यान
१२D – उद्यान व पोलीस ठाणे
शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून महापालिकेने मैदान, जॉगिंग ट्रॅक, सार्वजनिक बहुउद्देशीय इमारती आणि उद्यानांसाठी जागा राखीव ठेवल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल. पण, सिडकोने कोट्यवधी रुपयांच्या लालसेपोटी या आरक्षित भूखंडांची विक्री करून शहराला सिमेंटच्या जंगलात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, या भूखंडांवर बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. विकास आराखड्याला राज्य सरकारची मान्यता असल्याने सिडकोला आरक्षित जागा कायदेशीररीत्या विकता येत नाहीत. याबाबत शासनालाही कळविण्यात येईल, असे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांनी सांगितले.
(नक्की वाचा- Pune News : पुण्यात धावणार डबल डेकर बस; सुरुवातीच्या टप्प्यात कसा असेल मार्ग?)
सिडकोच्या या निर्णयाविरोधात महापालिका आक्रमक झाली असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकांना कुठलीही बांधकाम परवानगी नवी मुंबई महानगर पालिका देणार नाही अशा इशारा नगर रचना सहाय्यक संचलक सोमनाथ केकाण यांनी सिडकोला दिला आहे.