योगेश माने
महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि भारताला संपूर्ण जगाशी जोडण्यात नवी मुंबईचे विमानतळ (Navi Mumbai International Airport ) मोठी भूमिका बजावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi to inaugurate NMIA) यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हे विमानतळ अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असून, या विमानतळामुळे मुंबई महाराष्ट्राला एक बहुमान प्राप्त होणार आहे. गेल्या 25 वर्षांपासूनचे स्वप्न 8 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्णत्वास येणार आहे. NMIA सुरू होताच, मुंबई लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोसारख्या जगातील निवडक शहरांच्या यादीत समाविष्ट होईल. कारण ही निवडकच शहरे अशी आहेत ज्यामध्ये 2 विमानतळे आहेत. नवी मुंबईचे विमानतळ सुरू झाले तरी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद होणार नाही. ही दोनही विमानतळे सुरू राहणार असून मुंबई विमानतळावर येणारा भार विभागाला जाईल.
नक्की वाचा: लंडन-दुबईसारखा अनुभव महाराष्ट्रात! कसं असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ? वाचा A to Z माहिती
काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये? (Features of Navi Mumbai International Airport)
नवी मुंबईतील उलवेजवळ सुमारे 2,866 एकर जागेत हा विमानतळ उभा राहिला आहे. सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) भार कमालीचा वाढला असून तो कमी करण्यासाठी नवे विमानतळ मदत करेल. विमानांची वाढलेली संख्या, ती सामावून घेण्यासाठी अपुरी क्षमता यामुळे उड्डाणांना उशीर होतो आणि प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो. ही अडचण नव्या विमानतळामुळे लक्षणीयरित्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
मालवाहतूक क्षेत्राला मिळेल बळकटी
फक्त प्रवासीच नाही, तर NMIA व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठीही बळकटी देणारे विमानतळ ठरणार आहे. या विमानतळाची मालवाहतुकीची क्षमता ही दरवर्षी 3.25 MMTA (मिलियन मेट्रिक टन प्रति वर्ष) इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करण्याची क्षमता असलेले नवी मुंबई विमानतळ हे आशियातील आणि जगातील काही मोजक्या विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावर 3,700 मीटर लांबीच्या दोन समांतर धावपट्ट्या आहेत ज्यामुळे कमी दृश्यमानतेतही सुरक्षित विमान उड्डाण शक्य होईल.