
Navi Mumbai Airport Inauguration: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) 8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुंबईकरांची शहरातील दुसऱ्या विमानतळाची दीर्घकाळाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार नवी मुंबई विमानतळावरील वाहतूक सेवा नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिकांकडून विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. सोयीसुविधा आणि डिझाइन अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे विमानतळ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतच्या 7 खास गोष्टी | 7 Facts About Navi Mumbai International Airport (NMIA)
1. प्रवासी क्षमता आणि रनवेची लांबी (Passenger Capacity, Runway length)
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई महानगर प्रदेशास सेवा देणारे दुसरे विमानतळ आहे. सुरुवातीच्या टप्प्यात येथे रन-वे आणि टर्मिनल इमारत उभारण्यात आलीय.
- वर्षाला 9 कोटी प्रवासी येथून प्रवास करू शकतील, इतकी या विमानतळाची क्षमता आहे.
- विमानतळाच्या रनवेची लांबी 3,700 मीटर इतकी आहे.
- आधुनिक प्रवासी टर्मिनल्स आणि प्रगत हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली देखील उपलब्ध आहे.
2. प्रमुख विमान कंपन्या देणार सेवा
- इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस यासह प्रमुख विमान कंपन्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
- या कंपन्या प्रमुख देशांतर्गत ठिकाणांना जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.
3. कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा
विमानतळावरील कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केली जातेय. तंत्रज्ञानावर आधारित कार्गो सुविधा ज्यामध्ये प्रगत प्रणाली, विश्रामगृहांसह विविध अत्याधुनिक गोष्टींचा समावेश आहे.
4. मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी विमानतळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात 'मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी' निर्माण करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये एक्सप्रेस-वे, मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे नेटवर्क तसेच जलवाहतूक सेवांचा समावेश आहे. मेट्रो स्टेशनपासून विमानतळापर्यंत बहुपर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
5. विमानतळाचे खास डिझाइन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वास्तुकला ही आपले राष्ट्रीय फुल कमळाच्या फुलापासून प्रेरित आहे, ज्याचे भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.
(नक्की वाचा: Good News! नवी मुंबई विमातळापर्यंत सुरु होणार बससेवा; पालिकेने घेतला मोठा निर्णय)
6. टप्प्याटप्प्याने होणार विकास
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प 1,160 हेक्टर परिसरावर पसरलेला आहे आणि पाच टप्प्यांमध्ये हा प्रकल्प नियोजित आहे. वर्ष 2029 मध्ये टर्मिनल 2, वर्ष 2032 मध्ये टर्मिनल 3 आणि वर्ष 2036 मध्ये टर्मिनल 4 कार्यान्वित होणार आहे.
(नक्की वाचा: Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्टबाबत DGCA चा मोठा निर्णय, 'या' निर्णयाचा काय आहे फायदा?)
7. वॉटर टॅक्सी सुविधा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळास वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही निर्देश दिले आहेत. अशी सुविधा असणारे हे देशातील पहिलेच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world