- राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असलेल्या उलवे परिसरात सध्या बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणास सुरू आहेत. या भागात प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पेट्रोलची विक्री आणि घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार खुलेआम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या विमानतळ क्षेत्राच्या जवळच हे प्रकार सुरू असल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे.
130 रुपये दराने 'भेसळयुक्त' पेट्रोलची विक्री
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, उलवे परिसरात ठिकठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पेट्रोलची विक्री केली जात आहे. यासाठी प्रति लिटर 130 रुपये इतका दर आकारला जात आहे. हे पेट्रोल केवळ महागच नाही, तर ते भेसळयुक्त असल्याचा आरोपही वाहनचालकांनी केला आहे. ड्रग्स तस्करीच्या विळख्यानंतर आता या नवीन इंधन माफियांच्या संकटामुळे परिसर असुरक्षित झाला आहे.
जुन्या घटनांतून धडा नाही?
उलवे परिसरात अवैध गॅस रिफिलिंग आणि इंधन साठवणुकीचा प्रश्न जुनाच आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात सिलिंडर आणि पेट्रोलच्या अवैध साठ्यामुळे भीषण स्फोट झाला होता. या घटनेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहिलेले नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
(नक्की वाचा: Nagpur News: रंगाचा थेंब पडला अन् आजीने 4 वर्षाच्या नातवावर उकळतं पाणी ओतलं, CCTV पाहून होईल संताप; पाहा VIDEO)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विमानतळ परिसरात कोणत्याही प्रकारची आग किंवा स्फोटक साठा असणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पण विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या उलवे परिसरात अशा प्रकारे इंधनाचा साठा होणे, ही चिंतेची बाब आहे. यामुळे केवळ स्थानिक नागरिकच नाही तर राष्ट्रीय मालमत्तेलाही धोका निर्माण झाला आहे.
(नक्की वाचा: Nandurbar News: नंदुरबार हादरले! ती अचानक झाली गायब, 21 दिवसांनंतर शेताच्या बांधावर सापडला मृतदेह)
पोलीस आणि प्रशासनाने याविरोधात तातडीने कारवाई करावी? अशी मागणी स्थानिकांकडून केली जातेय.
Black market of petrol in Navi Mumbai नवी मुंबई विमानतळाबाहेर अवैधरित्या विकलं जातंय पेट्रोल