Navi Mumbai News: रिक्षावाला त्रास देतोय? अशी करा तक्रार; नवी मुंबई पोलिसांनी जारी केला हेल्पलाईन नंबर

Navi Mumbai News: रिक्षाचालकांच्या या मनमानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी यावर्षी मे महिन्यात एक विशेष मोहीम राबवली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे

Navi Mumbai Rikshaw Fare: पावसाळ्यात किंवा आपत्कालीन परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका बसतो अशा वेळी ऑटो रिक्षा हा प्रवाशांसाठी सर्वात सोयीचा पर्याय ठरतो. मात्र याच सोयीचा फायदा घेत, नवी मुंबईतील रिक्षाचालकांनी प्रवाशांची सर्रास लूट सुरू केली आहे. "मीटरमध्ये पाणी गेलंय" किंवा "मीटर बंद पडलंय" अशी कारणे देऊन चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, रिक्षाचालकांच्या उर्मटपणा आणि मुजोरीला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत.

नक्की वाचा: फडक्यात हात, शेतकऱ्यांचा घात; नवी मुंबईतील व्यापारी करतायत पिळवणूक

नेरुळ एलपी परिसरात रिक्षाचालकांच्या मनमानीचा कहर दिसून येत आहे. पहाटे गावाकडून परतणाऱ्या प्रवाशांना ट्रेन किंवा बसची सोय नसल्यामुळे त्यांना रिक्षावर अवलंबून राहावे लागते. याच मजबुरीचा फायदा घेऊन रिक्षाचालक प्रवाशांकडून भाड्याचे दर दुप्पट-तिप्पट आकारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळ ते सीवूड्ससाठी 200 रुपये, उलवेसाठी 300 रुपये, तर उरणसाठी तब्बल 450 रुपये भाडे मागितले जात आहे. केवळ नेरुळच नव्हे, तर सीबीडी, सानपाडा, वाशी हायवे, रबाळे नाका आणि कोपरखैरणे येथेही "मीटरबंद" टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. जर एखाद्या प्रवाशाने विरोध केला, तर "जायचं नसेल तर दुसरी रिक्षा बघ" असे उर्मट उत्तर देऊन चालकांकडून मुजोरी केली जात आहे.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ

केवळ भाड्याची लूटच नाही, तर प्रवाशांची सुरक्षाही या रिक्षाचालकांनी धोक्यात आणली आहे. एका रिक्षात चालकाव्यतिरिक्त फक्त 3 प्रवाशांना बसण्याची परवानगी असताना, नेरुळ ते उलवे आणि बेलापूर परिसरात एकाच रिक्षात 4-5 प्रवासी कोंबले जात आहेत. पावसामुळे आधीच खड्डेमय आणि निसरड्या रस्त्यांमुळे अपघातांची शक्यता वाढलेली असताना, अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण केला जात आहे.

कारवाई फक्त कागदावरच?

रिक्षाचालकांच्या या मनमानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मे 2025 मध्ये एक विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत 2,142 रिक्षाचालकांवर कारवाई करून 1.03 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यापूर्वी 2024 मध्ये 1,881 चालकांवर कारवाई करून 34.47 लाख रुपये दंड वसूल केला गेला होता. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही रस्त्यावरील परिस्थिती बदललेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आजही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट आणि नियमभंग सर्रास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई केवळ आकडेवारीपुरती मर्यादित असल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement

नक्की वाचा: ट्रॅफिकमुळे बाळाचा जीव गेला! मुंबईकडे येणारी अँब्युलन्स 5 तास अडकली, आईच्या कुशीतच थांबला श्वास

समस्या असल्यास 112 नंबर संपर्क साधण्याचे आवाहन

नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आम्ही नेरुळ एलपी परिसरात अंमलदार तैनात केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाचे गस्ती पथकही मोक्याच्या ठिकाणी आणि महामार्गांवर कार्यरत आहे. असे प्रकार घडत असतील तर नागरिकांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, त्वरित मदत दिली जाईल. तसेच वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवरही नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात." 

Topics mentioned in this article