
राहुल कांबळे
वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमांनुसार, भाजीपाला आणि फळांचा व्यापार नियमनमुक्त असूनही, येथे व्यापारी संगनमताने 'टॉवेल' किंवा 'गमजा' या गुप्त पद्धतीने मालाचा दर ठरवतात. त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळत नाही आणि त्यांची उघडपणे लूट केली जाते असा आरोप केला जात आहे.
नक्की वाचा: ट्रॅफिकमुळे बाळाचा जीव गेला! मुंबईकडे येणारी अँब्युलन्स 5 तास अडकली, आईच्या कुशीतच थांबला श्वास
प्रकरण काय आहे ?
ही 'टॉवेल' पद्धत म्हणजे व्यापाऱ्यांनी फडक्यात हात घालून गुप्तपणे मालाची किंमत ठरवणे. यामुळे शेतकरी समोर असतानाही त्याला त्याचा माल नेमका किती दराने विकला गेला, हे कळत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बाजारात ठरलेला खरा बाजारभाव व्यापाऱ्यांमध्ये वेगळा असतो, तर शेतकऱ्याला नंतर कमी दर दिला जातो. उदाहरणार्थ, जर माल 150 ते 160 रुपये किलो दराने विकला गेला असेल, तर शेतकऱ्याला व्यापारी फक्त 80 ते 90 रुपये किलोचा दर देतात. या प्रकारामुळे शेतकऱ्याला 60 ते 70 टक्के तोटा सहन करावा लागतो. यातून व्यापारी मालामाल होत असून, त्यासाठी ते शेतकऱ्याची पिळवणूक करत असल्याचा आरोप केला जातोय
नक्की वाचा: नवरात्रीत ठाण्यातील वाहतुकीतील मोठे बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?
शेतकऱ्याला दिली जातात थातूरमातूर कारणे
जेव्हा एखादा शेतकरी जास्त दर विचारतो, तेव्हा त्याला "आज पाऊस जास्त आहे", "आवक वाढली आहे" किंवा "तुमच्या फळांची साईज वेगळी आहे" अशी सबब दिली जाते. विशेष म्हणजे, जर एखादा व्यापारी शेतकऱ्याला थोडा चांगला दर देण्याचा प्रयत्न केला, तर इतर व्यापारी मिळून त्याच्यावर दबाव आणतात आणि त्यालाही दर कमी करायला भाग पाडतात. ही एक प्रकारची टोळीच तयार झाली असून, त्यांनी मार्केटवर पकड घेतली असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकाराला कंटाळून एखादा शेतकरी विरोध करू लागला, तर व्यापारी लगेच वाहतूकदाराला कळवून त्या शेतकऱ्याचा मालच उतरवून घेत नाहीत. परिणामी, शेतकरी हवालदिल होतो आणि त्याला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. या परिस्थितीमुळे शेतकरी आणखीच आर्थिक संकटात सापडला आहे. वाशी एपीएमसीमध्ये सुरू असलेल्या या संगनमताच्या व्यवहारावर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पारदर्शक लिलाव प्रणाली सुरू करणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world