गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षातून नेत्यांचे बाहेर पडण्याचे सत्र सुरू होते. मात्र आता त्याला ब्रेक लागून लवकरच पक्षात 'इनकमिंग' सुरू होणार असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 7 तारखेला ते मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्यावर 'आऊटगोइंग'ला तात्पुरता ब्रेक लागला, परंतु विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसची ताकद सर्वाधिक असलेल्या मराठवाडा आणि विदर्भात पक्ष कमकुवत करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, आता काँग्रेसकडून याला रोखण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला धक्का
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यांचे समर्थकांकडून 7 तारखेला काँग्रेस पक्षप्रवेश होणार असल्याबाबतचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.
(नक्की वाचा - MNS News: '15 दिवसात डान्सबार बंद करा नाहीत तर...', मनसेचा थेट इशारा)
यापूर्वी दुर्राणी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, परंतु काही कारणांमुळे हा प्रवेश रखडला. त्यानंतर दुर्राणी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढल्या होत्या आणि आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याचे दिसत आहे.