NDTV वृत्तसमूहाची नवी वृत्तवाहिनी 'NDTV मराठी' 1 मे 2024 पासून प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाली आहे. या वृत्तवाहिनीच्या लाँचिंगचा सोहळा मुंबईमध्ये होत आहे. मुंबईतील ताज लँडस एंडमध्ये शुभारंभाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाहिनीचे लोकार्पण करण्यात आले. या वाहिनीच्या पदार्पणानंतर एनडीटीव्हीच्या वाहिन्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 2 वरून 6 होणार आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NDTV मराठी वाहिनीला शुभेच्छा दिल्या. शिवाय समतोल पत्रकारीता व्हावी ही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या निमित्ताने NDTV चे CEO संजय पुगलिया आणि मुंबई ब्युरो चिफ रौनक कुकडे यांनी फडणवीसांची मुलाखत घेतली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मान्यवरांच्या मुलाखतीने रंगणार कार्यक्रम
या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत होत आहे. या दोघांव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल, मिलिंद देवरा यांच्याही मुलाखती होणार आहेत. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत आपापल्या पक्षांची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते सचिन अहीर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राजकीय क्षेत्रातील या मंडळींच्या मुलाखतींशिवाय मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेल्या मंडळींच्या मुलाखतींचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेत्री श्रिया पिळगांवकर आणि अभिनेता शरद केळकर या तिघांची एकत्र मुलाखत या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अंकिता लोखंडे या दोघींची एकत्र मुलाखतही आपल्याला या कार्यक्रमात पाहायला मिळेल.