NDTV मराठीच्या महाराष्ट्राचा जाहीरनामा कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे ( NDTV Marathi Coclave LIVE Updates) यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंतच्या कार्यकाळातील घडलेल्या घडामोडींचा उहापोह केला. NDTV मराठीच्या प्रतिनिधी कविता राणे यांनी पंकजा मुंडे यांची दिलखुलास मुलाखत घेतली. या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी लोकसभेतील अपयश, मराठी-ओबीसी वाद, महाराष्ट्राभोवती घोंगावणारे प्रश्न, त्यांच्यानावाभोवती असलेली मुख्यमंत्रिपदाबाबतची चर्चा (NDTV Marathi Coclave Pankaja Munde) यावर मनसोक्त भूमिका व्यक्त केली.
सत्तेत आल्यानंतर काय काम करणार, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधलं. महाराष्ट्रात गुन्हेगारीचं वाढलेलं प्रमाण, बेकायदेशीर दारू, ड्रग्सचा अवैध धंदा, पाणी मिशन या गोष्टींवर काम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या. पाणी हे मिशन आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्रकडे जाणारी वाटचाल जास्त महत्त्वाची आहे. गोपीनाथ मुंडेंनीदेखील गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी बरंच काम केलं, सध्या आपली मुलं ड्रग्स विळख्यात अडकत चालली आहेत. त्यामुळे मुलं जेव्हा 13-14 वयाची असतात तेव्हा पालकांनी जागरूक असावं लागतं. दुसरीकडे मुलांसमोर उदाहरण देता येईल असं पालकांनीही वागायला हवं, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
नक्की वाचा - NDTV Maharashtracha Jahirnama : 'न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून काही होत नाही', संजय राऊतांचं रोखठोक वक्तव्य
लोकसभेच्या पराभवाने काय घडलं?
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना संघर्ष करावा लागला होता. याबाबत त्या म्हणाल्या, लढणे हे स्वतःसाठी नसते, विषयांसाठी असते. याचे मी मूर्तिमंत उदाहरणही होऊ शकले. माझा मतदारसंघ मी हसतखेळत सोडला, इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश म्हणून लोकसभा लढले. याचे मूर्तिमंत उदाहरण होण्याची संधीही मुंडेसाहेबांच्या संस्कारामुळे मिळाली. वडील असतानाही मी त्यांचा हात धरून लढले आहे. तेव्हा मुंडेंसाहेबांसोबत नेते पक्ष सोडून गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. धनंजयसकट जिल्ह्यातील बऱ्याच नेत्यांनी तेव्हाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा माझे बाबा एकटे होते, तेव्ही मी एकटीने त्यांच्यासोबत काम करत होते. तेव्हा कार्यकर्त्यांची मोट बांधली. तर लढणे हे त्यांच्याबरोबच शिकले आणि त्यांच्यानंतर ते कसे सोडून देता येईल.
राजकारणात वैयक्तिक द्वेष नाही..
गोपीनाथ मुंडेंची साथ सोडून धनंजय मुंडे त्यावेळी राष्ट्रवादीत गेले होते. आज मी त्याचा प्रचार करते, तोही माझ्या प्रचाराला आला होता. मात्र राजकारण वैयक्तिक नसते. मी राजकारण करीत असताना वैयक्तिक टीका केली नाही, तिरस्कार केला नाही. आमचे पक्ष एकत्र आल्याने आम्ही एकत्र काम करतो. यंदाच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडेही उपस्थित होते. अजित दादाही माझ्या प्रचाराला आले होते. मी कोणाचाही वैयक्तिक तिरस्कार केला नाही. राष्ट्रवादी आणि आम्ही एका मंचावर येऊ असं कधी वाटलं नव्हतं. ही राजकारणातील घडी आहे आणि आम्ही त्याचाच भाग आहोत.
प्रीतम मुंडे यांचं राजकीय भवितव्य कसं असेल?
प्रीतम मुंडे यांचे भविष्य काय आहे, याचा विचार करण्यासाठी आता मी तेवढा वेळ देऊ शकणार नाही. पण त्यांचे भविष्य नक्कीच आहे, याची काळजी करणारी मी तेथे बसले आहे. कारणी मी त्यांची मोठी बहीण आहे. मुंडेसाहेबांनंतर कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. पण माझ्या कुटुंबाची जबाबादारी ही एवढी एकमेव जबाबदारी मला मुंडेसाहेबांनी मला दिलेली नाही. मुंडेसाहेबांच्या मृत्यूच्या घटनेमुळे प्रीतम ताई पोटनिवडणुकीमध्ये राजकारणात आल्या. कारण निकालानंतर केवळ 17 दिवसांत मुंडेसाहेब वारले आणि मग त्या आल्या. त्यांनी खूप उत्तम-सुंदर काम केले. पण पक्षाने माझा लोकसभा निवडणूक जाहीर केला म्हणजे मोदीजींच्या सहमतीने निर्णय जाहीर होतात, ते कसे डावलावे? मला काही केंद्रात जाण्याचा मानस नव्हता.
नक्की वाचा - प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे मोदी-शहांना मदत होते, संजय राऊतांचा थेट आरोप!
महिला मुख्यमंत्रिच्या चर्चेबद्दल काय म्हणाल्या पंकजा मुंडे..
महिला मुख्यमंत्र्याची चर्चा होते तेव्हा सुदैवाने माझे नाव येते. याचा मला आनंद वाटला पाहिजे. पण दुर्दैवाने 4-5 महिलांचेच नाव येते. 25-50 महिलांचं नाव आलं तर मला आनंद वाटेल. म्हणजे तितक्या महिला राजकारणात सक्रिय आहेत, असे वाटेल. तर कमी महिला राजकारणात सक्रिय असल्याने आमचे नाव येत असेल. पण माझं आणखी एक म्हणणे आहे यामध्ये महिलांमध्येच का बरं नाव यावं. सर्व महिलांचं असे कर्तृत्व असले पाहिजे की त्यांचे लिंगापलिकडे जाऊन नाव आले पाहिजे.
मराठा विरूद्ध ओबीसी संघर्ष..
मी ओबीसी समाजात जन्मले. पण मी स्वत:ला ओबीसी लीडर म्हणून पाहत नाही. मी पक्ष पाहून काम केलं. जात हा विषय डोक्यात आला नाही. मात्र सद्या असलेली परिस्थिती दुर्देवी वाटते. कोणत्याही समाजात वितुष्ट होऊ नये असं वाटतं. खरं काय ते मांडायला हवं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटी मजबूत आहेत. त्या कोणी मोडू शकत नाही. ही दरी सांधणं खूप कठीण काम आहे. हे मनापासून ज्याला करायचंच त्याच्यासाठी ही कठीण परिस्थिती आहे.