NDTV मराठीच्या महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिलखुलास मुलाखत दिली, यावेळी त्यांनी मोदी शहांसह प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला.
इंदिरा गांधींनंतर देशाचं नेतृत्व एकाही व्यक्तीकडे राहिलेलं नाही. अजूनही देशातील 16 राज्यात मोदी नाही. जम्मू काश्मीरमध्ये राजकारण केलं पण जनतेने त्यांना स्वीकारलं नाही. झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र , केरळ येथे मोदींना शिरकाव करता आलेला नाही. ते जगात फिरत असतील. ते जागतिक नेते असतील, मात्र देशाचे नेते आहेत का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, विरोधी पक्ष नेते नाही असा प्रकाश आंबेडकरांकडून आरोप केला जात आहे. मात्र राहुल गांधी उत्तम प्रकारे विरोधी पक्ष नेत्याची कामगिरी पार पाडत आहे. आम्ही प्रश्न विचारले म्हणून आम्हाला तुरुंगात टाकले. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे मोदी-शहांना मदत होत असते. काही अप्रत्यक्ष मदत करीत असतात. राज्यात काही लोक असे आहेच जे अप्रत्यक्षपणे मोदी-शहांना मदत करीत असतात. त्यात प्रकाश आंबेडकर आहेत.
कायदा सुरक्षेचा मोठा प्रश्न..
राज्यातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षा व्यवस्था हा मोठा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधींच्या दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. तुरुंगात बसलेले गुन्हेगार राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. हे राज्यानं कधीच पाहिलं नव्हतं. सरकार योजनेच्या घोषणा करतायेत. पण तिजोरी खाली आहे. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन वचननामा तयार केलाय. 4 तारखेला आम्ही आमचा जाहीरनामा प्रदर्शित करू. आम्ही एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करू. आम्ही एकत्रच आहोत आणि जाहीरनामा एकत्रच असायला पाहिजे.
नक्की वाचा - मविआकडून मुख्यमंत्रिपदाचे 3 चेहरे कोणते? संजय राऊतांनी NDTV मराठीच्या जाहीरनाम्यात सांगितली 'ती' नावं!
योजनांसाठी निधी कुठंय?
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनांसारख्या अनेक योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. त्याबाबत संजय राऊत म्हणाले, अडीच वर्ष हे सरकार काय करत होतं? कॅबिनेटमध्ये अडीचशे निर्णय घेतले जातात. प्रत्येक जातीनुसार महामंडळं तयार केली जात आहेत. पण निधी कुठून आणणार? हे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घोषणा करण्यात आल्या. अगदी लाडकी बहीण योजनासुद्धा. यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते, अशा घोषणा करणं आर्थिक बेशिस्तपणा. मात्र झारखंडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या योजनांवर टीका करण्यात आली. राजस्थानमध्ये अशा प्रकारच्या योजनांवर मोदींनी टीका केली. बहिणींची काळजी असेल तर त्यांच्यासाठी रोजगार सुरू करावा. बचत गटाच्या योजनेतून मदत करावी. दीड हजारात कुटुंब चालू शतत नाही. महिलांना सक्षम करून त्यांना उत्पन्न मिळावं म्हणून योजना तयार कराव्यात. मात्र नरेंद्र मोदीं सत्तेत रेवड्या वाटण्याचं काम सुरू आहे.
भाजप की राष्ट्रवादीसोबतच जागावाटप सोपं?
भाजपसोबत असताना आम्ही दोन पक्ष होतो. भाजप महाराष्ट्रात कमजोर होता. त्यांना राज्यात स्थान नव्हतं. पण त्यांनी आमच्या जागा खेचायला सुरुवात केली. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. मविआतील तिन्ही पक्ष मजबूत आहेत. तीन पक्षात 288 जागांचं वाटप करणं सोपं नाही. तरीही आम्ही चांगल्या पद्धतीने चर्चा केली. शिवसेना आणि भाजप असताना शेवटच्या मिनिटापर्यंत काही जागांवर वाद होता. आताही चार पाच जागांवर वाद आहे. काँग्रेस पक्षासोबत होणाऱ्या वादाबाबत ते म्हणाले, मी वाईट काहीच बोललो नाही. विजय वडेट्टीवर विद्वान आहेत. ते मुळचे शिवसैनिक आहेत. विद्वान असल्याशिवाय त्यांना काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपदी बसवलं का? त्याशिवाय नाना पटोले माझे अत्यंत जवळचे मित्र. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात आणि मी माझ्या पक्षाची मांडतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world