गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांची मालिका सुरु आहे. शनिवारी (21, डिसेंबर) सांगली जिल्ह्यातील बँगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्व जण हे सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकातील बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील नेलमंगला राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. आधी दोन कंटेनरच्या धडकेनंतर एक कंटेनर कारवर उलटला. ज्यामध्ये गाडीतील सहा जण जागीच ठार झाले. हा अपघात नेलमंगळा तालुक्यातील टी. बेगूर भागात घडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रथम कंटनर आणि ट्रकची धडक झाली. त्यानंतर कंटेनर कारवर पलटी झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाला. कारमध्ये पाच जण होते, त्यात दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातात मृत्यू झालेले कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावमधील असल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुली दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम इगाप्पागोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यामधील चंद्रम इगाप्पागोळ हे बँगळुरुमध्ये सॉफ्टवेअर कंपनीला कामाला होते. ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त ते सहकुटुंब गावी निघाले होते.
धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच चंद्रम इगाप्पागोळ यांनी नवी गाडी खरेदी केली होती. त्याच गाडीतून ते कुटुंबियांसोबत घरी निघाले होते, मात्र वाटेतच घडलेल्या भयंकर अपघाताने सर्वांचाच जीव गेला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.