Pune New Traffic Rules Speed Limit News: पुण्यातील नवले पुलावरील अपघातांची मालिका काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच नवले पुलावर ब्रेक फेल कंटेनरचा थरार पाहायला मिळाला ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर प्रशासनाने नवले पुलावरील वेगमर्यादेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आता नवले पुलावर 25 नोव्हेंबरपासून सर्व वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा निश्चित केली आहे.
अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे - मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बायपास मार्गावर होणारे वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.
याआधी फक्त नवले पुलावर वेगमर्यादा ठरवण्यात आली होती. आता भूमकर चौक ते नवले ब्रीजपर्यंत ही वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे. हा नवीन आदेश दिनांक २५/११/२०२५ पासून लागू करण्यात येत आहे. या नव्या वेगमर्यादेमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र या नव्या वेगमर्यादेमुळे वाहतुक कोंडी होण्याचीही शक्यता आहे.
नियम मोडल्यास होणार कारवाई
दरम्यान, नवले पुलावर तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग आपोआप वाढतो. तीव्र उतार असल्याने अनेक वाहन चालक गाडी न्युट्रल करतात, मात्र उतारामुळे पुन्हा नियंत्रण मिळवणे अवघड होते. आता वेगमर्यादा ठरवल्याने वाहन चालकांनी नियमांचे कठोर पालन करावे असं आवाहन करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न केल्यास सीसीटीव्ही तसेच स्पीड गनने लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.