स्वानंद पाटील, बीड
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण नको या मागणीसाठी बीड वडीगोद्री गावात आंदोलन सुरु आहे. प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज नववा दिवस आहे. बीडच्या हतोल्यात देखील मागील पाच दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ उपोषण सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता या आंदोलनात आरक्षणाच्या संरक्षणासाठी महिलाही आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथे रस्त्यावर उतरत महिलांनी टायरची जाळपोळ केली. यामुळे बीड-अहमदनगर-कल्याण महामार्ग काही काळ बंद होता. आमच्या भावनांचा विचार केला नाही तर दुर्गेचा अवतार धारण करू, असा इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे.
(नक्की वाचा- - तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णचं राहीलं, शेतकऱ्याच्या लेकीचं टोकाचं पाऊल)
धाराशिवमध्ये ओबीसी समाजाकडून आंदोलन
ओबीसी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील गोविंदपूर येथे सकल ओबीसी समाजाकडून आमरण उपोषण करण्यात येत आहे. शंकर कराड आणि नानासाहेब मुंडे यांनी हे उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. लक्ष्मण हाकेच्या मागण्या मान्य करून ओबीसी समाजाला न्याय देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
(नक्की वाचा- आजही तिहारमधून सुटका नाहीच, दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांच्या जामीनावर स्थगिती)
ओबीसी शिष्टमंडळाची आज सरकारसोबत चर्चा
प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनस्थळी गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळांनी भेट देत चर्चाही केली. हाके आंदोलनावर ठाम असल्याने सरकारच्या वतीने हाके यांना आज पाच वाजता मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी ओबीसी शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती करण्यात आलीय. यावर ओबीसी समाजाच्या वतीने छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे यांच्यासह विजय वडेट्टीवर यांचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यास जाणार असल्याच हाके यांनी म्हटलं आहे.