जाहिरात

4 दिवसांत खेळ खल्लास! 13 जूनच्या गुप्त बैठकीपासून ते 17 जूनच्या बंडापर्यंत; Operation Tiger चा थरारक रिपोर्ट

Operation Tiger Inside Story: 13 जूनपासून सुरू झालेला हा संपूर्ण राजकीय थरार नेमका कसा घडला आणि दिल्लीत काय हालचाली झाल्या, याचा सविस्तर घटनाक्रम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

4 दिवसांत खेळ खल्लास! 13 जूनच्या गुप्त बैठकीपासून ते 17 जूनच्या बंडापर्यंत; Operation Tiger चा थरारक रिपोर्ट
Operation Tiger Inside Story : 'ऑपरेशन टायगर' नंतर ठाकरेंकडे फक्त 3 खासदारच शिल्लक असल्याचं मानलं जातंय.
मुंबई:

Operation Tiger Inside Story: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी आखण्यात आलेले ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. 

या मोठ्या राजकीय बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता केवळ 3 खासदार शिल्लक राहिल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. या सर्व कायदेशीर घडामोडी आणि संभाव्य फुटीच्या विरोधात आता ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. 13 जूनपासून सुरू झालेला हा संपूर्ण राजकीय थरार नेमका कसा घडला आणि दिल्लीत काय हालचाली झाल्या, याचा सविस्तर घटनाक्रम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मातोश्रीवरील बैठकीला खासदारांची दांडी

या संपूर्ण राजकीय नाट्याची सुरुवात 13 जून 2026 रोजी झाली, जेव्हा ठाकरे गटाच्या काही खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. ही चर्चा समोर येताच उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने 14 जून 2026 रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. 

या बैठकीला अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष हजर राहिले, तर संजय दिना पाटील हे बैठक संपल्यानंतर मातोश्रीवर पोहोचले. नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे या बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. मात्र, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव हे या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. काही खासदारांनी आपण का येऊ शकलो नाही याचे स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांसमोर दिले खरे, पण या अनुपस्थितीने संशयाची पाल चुकचुकली होती.

मुंबईत बैठका आणि दिल्लीत गाठीभेटींचे सत्र

मातोश्रीवरील गैरहजेरीची चर्चा थांबत नाही तोपर्यंत 15 जून 2026 रोजी यवतमाळचे खासदार संजय देशमुख थेट दिल्लीत पोहोचले. त्यांनी तिथे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आणि राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. याच दिवशी मुंबईत उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. 

या बैठकीनंतर संजय राऊत यांनी खासदारांच्या पक्षांतराचे सर्व दावे फेटाळून लावले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी तातडीने दिल्ली गाठली. दुसरीकडे, ठाकरे गटाचे 5 ते 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात विलीनीकरण करण्याच्या हालचाली करत असल्याच्या बातम्या राष्ट्रीय पातळीवर झळकू लागल्या.

लोकसभा अध्यक्षांना पत्र

राजकारणातील या गुप्त हालचालींना 16 जून 2026 रोजी उधाण आले. शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी उघडपणे सांगितले की, ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात असून ठाकरे गटाचे 7 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याच दिवशी संध्याकाळी ठाकरे गटाचे 6 खासदार दिल्लीत पोहोचले आणि त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झाले. 

संपूर्ण परिस्थिती गंभीर बनल्याचे पाहून रात्री उशिरा खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कोणत्याही फुटीर गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी केली. तर संजय राऊत यांनी आपल्या खासदारांना मोठ्या आर्थिक ऑफर्स दिल्या जात असल्याचा थेट आरोप केला.

ऑपरेशन टायगरचा सर्वात मोठा टप्पा

या संपूर्ण ऑपरेशनचा सर्वात मोठा टप्पा 16 जून रोजी दुपारी 3 वाजता पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरे गटाच्या नाराज खासदारांनी आधीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे वेगळा गट स्थापन करण्यासाठी अधिकृत पत्र दिले होते. या पत्राबाबत 16 जून रोजी दुपारी 3 वाजता लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून खासदारांशी संपर्क साधण्यात आला. 

या खासदारांच्या स्वतंत्र गटाला तत्वतः मान्यता मिळाली असून, कायदेशीर प्रक्रियेनुसार हे खासदार आता स्वतः लोकसभा अध्यक्षांसमोर उपस्थित राहून पूर्ण मान्यतेची मागणी करणार आहेत. भविष्यात कोणतीही न्यायालयीन किंवा कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून 16 जणांच्या कायदेतज्ज्ञांच्या टीमच्या सल्ल्याने ही रणनीती आखण्यात आली होती. 

ही तत्वतः मान्यता मिळताच सर्व खासदारांना तातडीने दिल्लीत नेण्यात आले. आधीच पत्र दिल्यामुळे ठाकरे गटाकडून बजावल्या जाणाऱ्या व्हीपच्या कारवाईपासून या खासदारांना संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

 कोट्यवधींच्या ऑफर्सचे आरोप

नऊ पैकी सहा खासदार फुटल्याचे स्पष्ट होताच 17 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्व खासदारांना 18 जून रोजी दिल्लीतील संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कडक व्हीप जारी केला. दुसरीकडे, खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना आपण उद्धव ठाकरेंसोबतच ठाम असल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, संजय राऊत यांनी नांदेडहून दोन खासदारांना चार्टर्ड विमानाने दिल्लीला आणण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हान दिले की, ऑपरेशन टायगर इतके सोपे नाही, ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. खासदारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा पुनरुच्चार करत संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत पत्र सोपवले.

ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदार शिल्लक

या सर्व वेगवान घडामोडींनंतर शेवटी 17 जून रोजी ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार आता वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदार शिल्लक राहिले आहेत. या अत्यंत मोठ्या राजकीय फुटीमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात नवीन कायदेशीर लढाई सुरू होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com