Padma Award 2026 : आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील अभूतपूर्व कार्य करणाऱ्या दिग्गजांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनंतर बोथी गुरुजी यांनी राष्ट्र संतांच्या आश्रमाची धुरा सांभाळली. राष्ट्रसंतांचा विचार तळागाळात पोहोचवण्यात बोथे गुरुजींच मोलाच योगदान राहिलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमाचं भव्य निर्माण, तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, जयंती महोत्सव जागतिक पटलावर घेऊन जाण्यात त्यांनी मोठं काम केलं आहे.
विदर्भातील सर्वात मोठे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासोबत जनार्दनपंथ बोथे गुरुजी यांचा सहवास राहिला आहे. या पुरस्कारामुळे अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यावेळी बोथे म्हणाले, हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा सन्मान आहे. हा सन्मान मी राष्ट्र तुकडोजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. तुकडोजी महाराज यांना मानणाऱ्या देशभरातील सर्व गुरुदेव भक्तांचा हा सन्मान आहे.
पद्मश्री जनार्दन पंत बोथे गुरुजी यांचा परिचय
बोथे गुरुजी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३९ रोजी वाशिम जिल्ह्यातील तालुका मंगरूळपीर येथे झाला. त्यांनी एस.एस.सी. (सन १९५८), ए.टी.सी. (१९६४) चे शिक्षण घेतलं. १४ जुलै १९५४ स्वावलंबी विद्यामंदिर येथे कमवा व शिका या योजनेंतर्गत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांकडे दाखल झाले. १९६० ते १९६४ राष्ट्रासंतांसोबत कार्यालयीन कामकाज व निजी सचिव काम केलं, राष्ट्रासंतांसोबत त्यांचे प्रवासात निजी सचिव म्हणून सोबत होते. अनेक ठिकाणी भारतभर दौऱ्यामध्ये महाराजांसोबत उपस्थित होते.
१) किसान रेल यात्रा १९६१ (३० दिवस)
२) नेफा सरहद्दीवर लष्करासमोर भजन भाषण १९६२
३) गोमंतक १९६४
४) याशिवाय राष्ट्रपती भवन, नाशिक, हरिद्वार, प्रयात, कुंभमेळा, साधू समेलन, मुंबई येथील विश्व हिंदू परिषद, पंढरपूर आषाढी यात्रा, केरळातील नारायानगुरू संस्थान इत्यादी महत्वाच्या दौऱ्यात तुकडोजी महाराजांसोबत सहभागी.
५) तुकडोजी महाराजांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे टेपरेकॉर्डिंग, लघुलेखन, भजनाची साथ, फोटोग्राफी इत्यादी महत्त्वाची कामे केली. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अंतिम वेळी आजारपणात सेवा दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वारसा चालविणाऱ्या बोथे गुरुजींचे कार्य...
जनार्दन बोथे गुरुजी यांनी आपल्या जीवनातील पाच दशकांहून अधिक काळ समाज कार्यासाठी वाहिला आहे. शिक्षण, ग्रामीण विकास, अध्यात्मिक प्रचार आणि मानवसेवा यामार्फत त्यांनी मोठी कामगिरी केली. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम (स्थापना १९४२, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज) यांचे प्रमुख सचिव म्हणून त्यांनी अध्यात्मिक मूल्यांना समाजातील मूळ पातळीवर परिवर्तनकारी कृतीत रूपांतरित केले आहे. दलित, आदिवासी आणि वंचित घटकांसाठी शिक्षणाची तातडीची गरज ओळखून, त्यांनी १९७२ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्था स्थापन केली. या उपक्रमांतर्गत त्यांनी आदिवासी व दुर्गम भागांमध्ये ११ निवासी शाळा व वसतिगृहे सुरू करून हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. त्यांचे नेतृत्व केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता, शिस्त, मूल्य, आणि नेतृत्वगुणांचाही संस्कार करणारे ठरले. बोथे गुरुजींनी वैयक्तिक कीर्तीच्या पलिकडे जाऊन, संपूर्ण समाजरचनेत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला. निःस्वार्थ सेवा, नीतिनिष्ठा आणि दृष्टीकोन ठेवला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world